उपोषणावर दादा भुसेंची प्रतिक्रिया, म्हणाले जरांगे पाटलांना विनंती…
मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे, त्यांच्या उपोषणावर शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभारला, त्यांच्या आंदोलनानंतर सरकारनं मराठा समाजासाठी स्वतंत्र दहा टक्के आरक्षणाला मंजुरी देखील दिली. मात्र मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळावं या आपल्या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. त्यासाठी त्यांनी आजपासून पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या या उपोषणामुळे पुन्हा एकदा सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. यावर आता शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले दादा भुसे?
जरांगे पाटलांना विनंती आहे, आवाहन करतो गोरगरिबांना त्या ठिकाणी आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची देखील पूर्वीपासूनची भूमिका आहे. तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावेळी मराठा समाजासाठी दहा टक्के स्वतंत्र आरक्षणाची घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी प्रगतीपथावर आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये एक पिटिशन प्रलंबित आहे, त्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राचे सर्वेक्षण करून मराठा समाजात जे मागासलेले अनेक गोरगरीब बांधव आहेत, त्यांना शौक्षणिक आणि नोकरीच्या संदर्भात आरक्षण देण्याची भूमिका आहे. हा संपूर्ण अहवाल आपण मांडायला घेत आहोत आणि या सर्व गोष्टी प्रगतीपथावर आहेत, असं भुसे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी नाशिकच्या पालकमंत्रिपदावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. या संदर्भातले जे काही निर्णय असतील ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे निर्णय घेतील. त्यांनी केलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणं हे आमचं काम जबाबदारी आहे, असं भुसे यांनी म्हटलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच लागू शकतात असे संकेत मिळत आहेत, यावर देखील दादा भुसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या बाबतीत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे वरिष्ठ स्तरावर निर्णय घेतील, ते जे निर्णय घेतील त्याची अंमलबजावणी करणं आमचं काम आहे, असं भुसे यांनी म्हटलं आहे.
महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याचे संकेत उद्धव ठाकरे यांच्याकडून देण्यात आले आहेत, यावरून भुसे यांनी त्यांना टोला लगावला आहे. तो त्यांचा विषय आहे. एकेकाळी आमदारांची संख्या किती होती? ती आता कितीवर आली आहे? खासदारांची संख्या 18- 20 होती की आठवर आली आहे, त्याचे चिंतन उद्धव ठाकरे यांनी केलं पाहिजे, असं भुसे यांनी म्हटलं आहे.