‘नाराजीने राज्य चालत नाही, मेहनतीने राज्य चालतं’, माजी मंत्री दीपक केसरकर काय म्हणाले?
दीपक केसरकर यांना नवीन मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. यानंतर त्यांनी आज शिर्डीला जावून साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्यांनी आपल्या नाराजीच्या चर्चांवर स्पष्टीकरण देत, राज्यकारभार मेहनतीने चालतो, नाराजीने नाही, असं म्हटलं.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री दीपक केसरकर यांना यावेळी मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा आहे. दीपक केसरकर यांनी शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेतलं. यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांना त्यांच्या नाराजीबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली. “किती दिवस तुम्ही नाराजी नाराजी करत बसणार? आता मंत्र्यांना चांगल्या कामासाठी सदिच्छा दिल्या पाहीजे. त्यांच्या आनंदात आपण सहभागी झालं पाहीजे. नाराजीने राज्य चालत नाही. मेहनतीने राज्य चालतं. सत्ता कट करणं हा भाग नसतो. माझं स्टेटमेंट चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आलं. गोव्याला एव्हढे लोक जात असतील तर कोकणात का नाही? त्यासाठी साईबाबांनी मला काम करण्याची संधी दिली”, अशी प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिली.
“साईबाबांच्या दर्शनाने एक नवी ऊर्जा प्राप्त होते. मंत्री न बनल्यामुळे मला कोकणवासीयांची सेवा करण्याची संधी मिळेल. बाबांच्या आशीर्वादाने काम लवकर घडतं. बाबांकडून आशीर्वाद मागितल्यावर जनतेला सुख समृद्धी लाभेल हा विश्वास आहे. शेतकरी सुखी झाला तर महाराष्ट्र सुखी होतो. नवीन सरकार आलेलं आहे. त्यांना साईबाबा शक्ती देवो ही प्रार्थना”, असं दीपक केसरकर म्हणाले.
दीपक केसरकर बीड सरपंच हत्या प्रकरणार काय म्हणाले?
दीपक केसरकर यांना यावेळी बीड सरपंच हत्या प्रकरणाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. “वाल्मिक कराडला शंभर टक्के अटक होईल आणि शिक्षा होईल हे मी अगोदरच बोललोय. त्याचा कुणाशी संबध आहे हे सिद्ध झालं नाही. जेव्हा काही सिद्ध होईल तेव्हा त्यावर बोलता येईल. आज बोललं तर कुणाचीतरी बदनामी करणं होईल. पोलीसांना निष्पक्ष चौकशी करण्याची संधी द्यायला हवी”, अशी प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिली. तसेच “तपासाला एवढी पथकं लागली होती की सरेंडर झाले नसते तरीही अटक झाली असती. परिवार आणी संबंधितांची खाती सील केली गेली. त्यामुळे दुसरा पर्यायच नव्हता. गुन्हेगार म्हणत असतो मी सरेंडर झालो मात्र असं काही नव्हतं”, असं दीपक केसरकर म्हणाले.
“भाजप नेते सुरेश धस हे आक्रमक नेते. स्वभावानुसार वेगवेगळे विषय सभागृहात मांडत असतात. त्यांनी तसे विषय मांडले तर काहीही चुकीचं नाही”, असं दीपक केसरकर म्हणाले. “मुख्य आरोपीला अटक झालीय. इतर आरोपींनाही लवकरच अटक होईल. कुठल्याही गोष्टीला तपास करायला पोलिसांना संधी दिली पाहीजे. अशा प्रवृत्तीचा तरच नाश होईल. एका प्रकरणातून अनेक प्रकरणे बाहेर निघालीय. राखेच्या व्यवसायातून गुन्हेगारी फोफावत असेल तर त्यास आळा घालायचं काम सरकार करेल”, असं दीपक केसरकर यांनी सांगितलं.