एकनाथ खडसे यांना चप्पल घालायला पैसे राहणार नाही, गिरीश महाजन यांचा प्रहार
eknath khadse girish mahajan | राम मंदिरासाठी कारागृहात असल्याच्या वक्तव्यावरुन एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात वाद पेटला आहे. एकनाथ खडसे यांनी केलेल्या वक्तव्यावर मंत्री गिरीश महाजन यांनी जोरदार उत्तर दिले आहे. एकनाथ खडसे यांच्या डोक्यावर परिणाम, त्यांचा इलाज मला करावा लागणार असल्याचे गिरीश महाजन म्हणाले.
चंदन पुजाधिकारी, नाशिक, दि.29 डिसेंबर | जळगाव जिल्ह्यातील दोन नेते एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील वाद राज्यभर परिचित आहे. दोन्ही नेते एकमेकांवर टीका करताना सर्व पातळी सोडून देतात. आता पुन्हा राम मंदिरासाठी कारागृहात असण्याच्या विषयावरुन दोन्ही नेत्यांमध्ये वाद सुरु झाला आहे. ‘अयोध्येतील राम मंदिरासाठी दोन्ही वेळेस कारसेवक म्हणून मी सहभागी होतो. त्या आंदोलनात ललितपूर जेलमध्ये मी होतो. परंतु गिरीश महाजन हे आमच्या सोबत होते, हे मला काही आठवत नाही. ते कोणत्या जेलमध्ये होते, ते माहिती नाही’, असे एकनाथ खडसे म्हणाले होते. त्याला जोरदार प्रत्युत्तर मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमधून दिले आहे. एकनाथ खडसे यांच्या डोक्यावर परिणाम, त्यांचा इलाज मला करावा लागणार आहे, असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले गिरीश महाजन
एकनाथ खडसे यांनी सर्वत्र मी दिसतो. त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यांच्यावर मला इलाज करावा लागणार आहे. आता त्यांना चप्पल घालायला पैसे राहणार नाही. कारण गौण खनिजाचे उत्खनन केल्याप्रकरणी त्यांना 137 कोटी रुपये भरावे लागणार आहे. तसेच 27 कोटी दंड भोसरी प्रकरणात भरावा लागणार आहे. यामुळे त्यांची परिस्थिती चांगली नाही. त्यामुळे ते फालतू प्रश्न विचारात राहतात. कारसेवा आंदोलनात ते वेगळ्या जेलमध्ये होते. मी तत्कालीन खासदार गुणवंतराव सरोदे, वाय.जी.महाजन वेगळ्या कारागृहात होते. तेव्हाचे आमचे फोटो देशभर गाजले होते. आता गिरीश महाजन यांच्या टीकेला एकनाथ खडसे काय उत्तर देणार? हे पाहवे लागणार आहे.
राज ठाकरे येणार असतील स्वागत
भाजपसोबत खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी आहे. आम्ही सर्व मिळून लढणार आहे. राज ठाकरे हे समविचारी आहे. यामुळे ते आमच्यासोबत येत असतील तर कुणाला हरकत नसावी. राज ठाकरे सरकारवर टीका करत असतात, त्यावर बोलनाना गिरीश महाजन म्हणाले की, जिथे चुकत असेल तेथे टीका केली पाहिजे. परंतु राज ठाकरे महायुतीत आले तर आमची ताकद वाढेल. कारण त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे.