‘उद्धव ठाकरेंकडे 20 आमदार घेऊन सांगून आलो की…’, गुलाबराव पाटील यांचा मोठा गौप्यस्फोट
"मी पहिला नंबरने गेलो नाहीय. सर्वात शेवटी जाणारा आमदार तुमचा गुलाबराव पाटील आहे. जेव्हा तुम्ही कुत्र्यासारखं हाकलत असाल, एक सरपंच फुटला तर या गुलाबराव पाटील रात्रभर झोप लागत नाही आणि जेव्हा 40 फुटल्यावर थोडी लाज शरम तरी पाहिजे होती", असा घणाघात गुलाबराव पाटील यांनी केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारलं तेव्हा ते गुजरातच्या दिशेला गेले होते. त्यावेळी काही आमदार शिंदे यांच्यासोबत गेले नव्हते. त्यामध्ये विद्यमान मंत्री गुलाबराव पाटील हे देखील होते. गुलाबराव पाटील हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी होते. पण त्यानंतर ते देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेले होते. त्यावेळी नेमकं काय घडलं होतं? याचा गौप्यस्फोट मंत्री गुलाबराव पाटील यांनी आजच्या भाषणात केला. “आम्ही गद्दारांची अवलाद नाही. आम्ही गद्दार नाही. आम्ही उठाव करणारी अवलाद आहे. मी गद्दार नाही. उद्धव ठाकरे यांच्याकडे 20 आमदार घेऊन सांगून आलो. त्यांना सांगितलं एकनाथ शिंदे जात आहेत. आपला एक प्रमुख चेहरा वापीमध्ये गेला आहे. त्यांना परत बोलवा. त्यावेळी त्या ठिकाणी खासदार संजय राऊत नावाचा माणूस होता तो म्हटला तुम्हाला जायचं असेल तर जा. तेव्हा गुलाबराव पाटील तिथून गेला. 40 आमदार गेले ना त्यात माझा 33 वा नंबर होता”, असा गौप्यस्फोट गुलाबराव पाटील यांनी यावेळी केला.
“मी पहिला नंबरने गेलो नाहीय. सर्वात शेवटी जाणारा आमदार तुमचा गुलाबराव पाटील आहे. जेव्हा तुम्ही कुत्र्यासारखं हाकलत असाल, एक सरपंच फुटला तर या गुलाबराव पाटील रात्रभर झोप लागत नाही आणि जेव्हा 40 फुटल्यावर थोडी लाज शरम तरी पाहिजे होती. या लोकांना थांबवल नाही कारण यात उद्धव ठाकरे यांची चूक कमी असेल. पण उद्धव ठाकरे यांच्या आजूबाजूला जे चमचे आहेत त्यांनी या पार्टीला लंब घातलं”, असा घणाघात गुलाबराव पाटील यांनी केला.
‘कार्यकर्त्यांना मी माझं कुटुंब समजतो’
“आज काय परिस्थिती आहे, पन्नास वर्षांमध्ये एवढी कामे झाले नाही तेवढी कामे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. एकटा गुलाबराव पाटील नाही तर माझ्यासमोर बसलेले तुम्ही सगळे गुलाबराव पाटील आहेत, या पद्धतीने आपलं काम आहे. कार्यकर्त्यांना मी माझं कुटुंब समजतो आणि त्यांच्याच भरोशावर मी राजकारण करतो”, असं गुलाबराव पाटील म्हणाले. जळगाव ग्रामीण मतदारसंघातील शिवसेना, युवासेना, महिला आघाडी आणि इतर आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत मंत्री गुलाबराव पाटील यांनी शेरोशायरी करत भाषणात जोरदार फटकेबाजी केली. शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी मुंबईतून ऑनलाईन पद्धतीने या बैठकीत सहभागी होत मंत्री गुलाबराव पाटील यांचं पूर्ण भाषण ऐकलं.
‘फेविकॉलचा जोड, लक्स साबण, एक बार लगावो आणि गोरा बन जा’
“आमच्याकडे जी कार्यकर्त्यांची फौज आहे हा फेविकॉलचा जोड आहे. लक्स साबण आहे. एक बार लगावो आणि गोरा बन जावो याप्रमाणे आमचा कार्यकर्ता आहे. कार्यकर्त्यांच्या भरोशावर हा गुलाबराव पाटील राजकारण करतो. तू प्यार करता है वो दिल से प्यार करता है और जो उखाड देता है वो दिल से उखाड देता है अशा पद्धतीची लोकं आहेत. कार्यकर्ता हे माझं कुटुंब आहे. त्यामुळे कार्यकर्ता हीच माझी दौलत हीच माझी शक्ती. याच शक्तीच्या जोरावर मी एकनाथ शिंदे यांना वचन दिलेलं आहे”, असं गुलाबराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं.
“एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होईपर्यंत गुलाबराव पाटील हा स्वस्थ बसणार नाही, अशी शपथ मी घेतलेली आहे. आजपर्यंत तुम्ही ज्या निष्ठेने माझ्या पाठीशी उभे राहिले त्या निष्ठेने तुम्ही यापुढे उभे राहा. आपण एकत्र काम करू. गेल्यावेळी जळगाव ग्रामीण मतदारसंघाने मला 25 हजारचा लीड दिला होता. यावेळी हे लीड 40 हजाराचं झाल्याशिवाय राहणार नाही. महिलांना बहिणींना मला हे सांगायचं आहे की तुम्हाला पंधराशे रुपये हे तीन हजार करायचं आहे आणि हे फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करू शकतात. 75 टक्के महिला आणि 25% पुरुष असं सुद्धा मतदान झालं तर समोरच्याच राम भाई राम झालं म्हणून समजा”, असं गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.