शिंदे गटाचा रांगडा गडी म्हणतो, ‘एका बैठकीत दोन म्हशींचे दूध काढले तर…’
आम्ही देव नाहीत. आम्ही सुध्दा माणसं आहोत. आम्ही सर्व शेतकरी आहोत. माझ्याकडे पाच म्हशी आहेत. माझ्यासोबत शेतात चला, एका बैठकीत दोन म्हशींचे दूध काढू शकलो नाही तर नावाचा....
जळगाव : 24 सप्टेंबर 2023 | आमदार अपात्रेबाबत सोमवारी विधानभवनात विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे सुनावणी होणार आहे. विधिमंडळाच्या अधिकाऱ्यांनी दोन प्रतिस्पर्धी गटांतील 54 आमदारांना शनिवारी नव्याने नोटीस बजावून विधानभवनात सुनावणीसाठी बोलावले आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना अद्याप नोटीस बजावण्यात आल्या नाहीत. जर, विधानसभा अध्यक्ष यांना तसे वाटल्यास तसा निर्णय ते घेतील, असे शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले. जळगाव येथे ते पत्रकारांशी बोलत होते.
जळगाव जिल्हा दूध संघाची सर्वसाधारण सभा पार पडली. त्यावेळी सभेत बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाषणातून जोरदार फटकेबाजी केली. एका शेतकऱ्याने संचालकांकडे म्हशी, गायी सुध्दा नाहीत. त्यांना शेतकऱ्यांच्या समस्या काय कळणार अशी टीका केली होती.
शेतकऱ्याच्या या टीकेला उत्तर देताना गुलाबराव पाटील म्हणाले, ‘आम्ही असेच जन्माला आलो आहोत का? आम्ही देव नाही, आम्ही सुध्दा माणसं आहोत. आम्ही सर्व शेतकरी आहोत. माझ्याकडे पाच म्हशी आहे, माझ्यासोबत चला शेतात, एका बैठकीत दोन म्हशींचे दूध काढू शकलो नाही तर नावाचा गुलाबराव पाटील नाही.
तर राजीनामा देऊ…
आमच्याकडून जे होण्यासारखं आहे, ते निश्चित करु. मात्र, जे होण्यासारखं नाही त्यावर काही तरी मार्ग नक्कीच काढू, तुमच्या विश्वासाला आम्ही तडा जावू देणार नाही. मंत्री आहे म्हणून सोडा. पण, ज्या दिवशी आम्हाला वाटलं की, दूध संघाचा विकास करु शकत नाही, त्यादिवशी आम्ही सर्व जिल्हा दूध संघाचा राजीनामा देवू असे वचन देतो, असे त्यांनी यावेळी सांगितले.
एकनाथ खडसे तज्ञ संचालक
एकनाथ खडसे यांनी इकडे यायला पाहिजे होतं. ते तज्ञ संचालक आहेत. ते इथे आले असते तर आमच्या ज्ञानामध्ये प्रकाश पडला असता. टीका करण्यामध्ये अर्थ नाही त्यांनी इथे येऊन सूचना करायला पाहिजे होती. आम सभा ही आरसा आहे आणि त्यात सर्व दिसणार आहे असा टोलाही त्यांनी लगावला.