‘त्या लोकांशी माझा संघर्ष’; मंत्री होताच जयकुमार गोरे यांचा टार्गेट फिक्स? पाहा कुणावर साधला निशाणा
"ज्या लोकांनी आमच्या भागाला दुष्काळी ठेवला त्या लोकांशी माझा संघर्ष आहे. मग ते रामराजे असतील किंवा शरद पवार असतील. माझ्या भागातील शेतकऱ्यासाठी कुणालाही अंगावर घ्यायला लागलं तरी घेऊ", असं मोठं वक्तव्य नवनिर्वाचित मंत्री जयकुमार गोरे यांनी केलं.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी आज पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर यांच्यावर टीका केली. “ग्रामविकास खातं हे राज्यातील एक मोठं खातं आहे. मता त्याची जबाबदारी मिळाली, ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचा संकल्प केला आहे. मी कोणतीही अपेक्षा ठेवून काम केलं नाही. माझ्या तालुक्यातील पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे आणि शेतकरी संपन्न झाला पाहिजे या भावनेने काम केलं. माण खटावचा दुष्काळ हटवू शकतो तर हे खातही चांगल्या प्रकारे सांभाळू शकतो. मुख्यमंत्र्यांना अपेक्षित असणारे काम मी नक्की करेन”, अशी पहिली प्रतिक्रिया जयकुमार गोरे यांनी दिली. “पक्ष नेतृत्व कोणाला काय जबाबदारी द्यायची ते ठरवेल. मुख्यमंत्री कुठला पालकमंत्री कोणाला करायचं हे ठरवतील. मुख्यमंत्र्यांना माहित आहे कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भारतीय जनता पक्षाकडे असावं”, अशीदेखील प्रतिक्रिया गोरे यांनी दिली. तसेच “महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस पडणारा माझा मतदारसंघ आहे. येणाऱ्या चार वर्षाच्या आत माझा माण खटाव दुष्काळ मुक्त असेल”, असा दावा जयकुमार गोरे यांनी केला
जयकुमार गोरे शरद पवर यांच्याबद्दल काय म्हणाले?
“शरद पवार यांना या जिल्ह्याने खूप प्रेम दिले. शरद पवारांनी जिल्ह्याला परत काय दिलं हे शोधून देखील सापडत नाही. मसवड आणि माण खटावमध्ये एमआयडीसी मंजूर केलेली आहे. ती साडेआठ हजार एकरामध्ये असेल. मी माझ्या मतदारसंघाच्या आणि जिल्ह्याच्या विकासाला आडवा येणाऱ्या लोकांना नेहमीच अंगावर घेतो”, असं जयकुमार गोरे म्हणाले.
जयकुमार गोरे रामराजे निंबाळकर यांच्याबद्दल काय म्हणाले?
“रामराजे निंबाळकर यांनी 19 वर्षे कृष्णा खोरे सांभाळल्यानंतर स्वतःचा तालुका दुष्काळमुक्त केला आणि आमच्या तालुक्याला पाणी द्यायचा प्रयत्न केला नाही. अशा नेतृत्वाशी आमचा संघर्ष होता. ज्या लोकांनी आमच्या भागाला दुष्काळी ठेवला त्या लोकांशी माझा संघर्ष आहे. मग ते रामराजे असतील किंवा शरद पवार असतील. माझ्या भागातील शेतकऱ्यासाठी कुणालाही अंगावर घ्यायला लागलं तरी घेऊ”, असं जयकुमार गोरे म्हणाले. “कार्यकर्त्यांनी 15 ते 17 वर्षे संघर्ष केलाय. कार्यकर्त्यांना भेटण्याची इच्छा उद्या पूर्ण होईल”, असंही जयकुमार गोरे यावेळी म्हणाले.