‘…ते मी सांगू शकत नाही’, मंत्र्यांमधील खडाजंगीच्या चर्चांवर शंभूराज देसाई यांनी सस्पेन्स वाढवला
'मी गोपनीयतेची शपथ घेतली आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीत काय चर्चा झाली ते मी सांगू शकत नाही', असं स्पष्ट वक्तव्य मंत्री शंभूराज देसाई यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीमधील धुसफुसीच्या चर्चांबाबत सस्पेन्स आणखी वाढला आहे.
महायुतीमध्ये सुरु असलेल्या घडामोडी आता कुठपर्यंत जातील? हे आगामी काळात स्पष्ट होईलच. पण राज्य मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीत नेमकं काय घडलं किंवा काय चर्चा झाली याबाबतची माहिती आपण देवू शकत नाही, अशी प्रतिक्रिया राज्याचे उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे. शंभूराज देसाई यांच्या या प्रतिक्रियेमुळे महायुतीमधील घडामोडींबाबतचा सस्पेन्स जास्त वाढला आहे. महायुतीत सध्याच्या स्थितीत सारं काही आलबेल नाही, अशीच परिस्थिती आहे. कारण राज्य मंत्रिमंडळाची काल बैठक पार पडली. या बैठकीत निधी वाटपावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री विजयकुमार गावित यांच्यात खडाजंगी झाल्याची चर्चा आहे.
अजित पवार हे अर्थमंत्री आहेत. गिरीश महाजन यांच्यासह गुलाबराव पाटील आणि विजयकुमार गावित यांनी अजित पवारांकडे निधीची मागणी केली. पण अजित पवार यांनी स्पष्ट नकार दिला. त्यामुळे या नेत्यांमध्ये खडाजंगी झाल्याची चर्चा आहे. अजित पवार यांनी निधी देण्यास नकार दिल्यानंतर दोन्ही बाजूच्या मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे अजित पवार हे काल रात्री अचानक दिल्लीला गेले. तिथे त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी निधी वाटपावरुन जे काही घडलं त्यावर नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे.
यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अजित पवार यांच्या भेटीला गेले. या सर्व घडामोडींवर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या घटनांवरुन महायुतीवर निशाणा साधला आहे. तर शंभूराज देसाई यांनी कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत काय चर्चा झाली ते सांगण्यास स्पष्ट नकार दिला आहे. तसेच आमच्यात असा कुठलाही वाद झाला नाही, असं स्पष्टीकर शंभूराज देसाई यांनी दिलं आहे.
शंभुराज देसाई यांनी सस्पेन्स वाढवला
“मंत्रिपदाची शपथ घेताना सर्व मंत्र्यांना गोपनीयतेची शपथ दिली जाते. त्यामुळे मी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मी गोपनीयतेच्या शपथला बांधिल असल्यामुळे मी मंत्रिमंडळ बैठकीत काय चर्चा झाली हे मी सांगू शकत नाही. पण असा वादविवाद आमच्यात कधीच होत नाही. तसा कालही झाला नाही”, अशी प्रतिक्रिया देत शंभूराज देसाई यांनी याबाबतच्या घटनांबाबत सस्पेन्स वाढवला.
विजय वडेट्टीवार यांची टीका
“खडाजंगीला सुरुवात आहे. आता यापुढे कपडे फाडाफाड होईल. कारण महाराष्ट्रात सध्या निधीची लुटालुट सुरु आहे. ठोसे मारण्यापर्यंत गोष्टी जाणार. महाराष्ट्रात सध्या शीतयुद्ध सुरु आहे. या शीतयुद्धात ठोसे सुद्ध किंवा कपडेफाट युद्ध होऊ नये म्हणजे महाराष्ट्राची इज्जत वाचेल”, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.
संजय शिरसाट काय म्हणाले?
शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी या घडामोडींवर प्रतिक्रिया दिली. “आरोप-प्रत्यारोप होत आहेत ना? त्यावेळेला त्यांनीसुद्धा एक सामंजस भूमिक घेऊन निधीवाटप हा याच आठवड्यात व्हायला पाहिजे. याच आठवड्यात झाल्यास त्याची टेंडर प्रोसेस करुन मतदारसंघात कामं करता येतात. म्हणून आम्हीसुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आग्रही असणार आहोत की, आमचा जो हक्काचा निधी आहे, जो विकासासाठी पाहिजे तो दिला पाहिजे. मग त्यासाठी काय करावं लागेल हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही त्यामध्ये जाणार नाहीत. पण आम्हाला सुद्धा आवश्यक आहेच”, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली.