सर्वात मोठी बातमी | अंबादास दानवे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात? मंत्री उदय सामंत यांचा गौप्यस्फोट!
एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे आधीच खिळखिळ्या झालेल्या संभाजीनगर ठाकरे गटाच्या शिवसेनेला आणखी एक धक्का बसू शकतो. मंत्री उदय सामंत यांनी अयोध्येत जाऊन मोठं वक्तव्य केलंय.
गिरीश गायकवाड, अयोध्या (उत्तर प्रदेश) : राजकारणात (Politics) कधीही काहीही घडू शकतं. विरोधी पक्षातील नेत्यावर विखारी टीका करणारा नेता कधी बदलेल आणि त्याच पक्षात जाऊन बसेल सांगता येत नाही. गेल्या वर्षभरात महाराष्ट्राच्या राजकीय (Maharashtra Politics) भूमीवर असे अनेक लहान मोठे भूकंप घडले. राज्यात असाच आणखी एक भूकंप होऊ शकतो, असं भाकित उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केलंय.
ठाकरे गटाचे नेते, छत्रपती संभाजीनगरचे आमदार आणि सध्या विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते असलेले अंबादास दानवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत, असं वक्तव्य सामंत यांनी केलंय. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाल्याने त्यांच्याकडे येणाऱ्या नेते, कार्यकर्त्यांचा ओघ आणखी वाढणार आहे, असं भाकित यापूर्वीच अनेकांनी केलंय. त्यात आता अंबादास दानवे यांचं नाव आल्याने चर्चांना उधाण आलंय. मंत्री उदय सामंत यांनी अयोध्येतील एका पत्रकार परिषदेत हे वक्तव्य केलंय.
नेमकं काय म्हणाले उदय सामंत?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार, खासदार सध्या अयोध्या दौऱ्यावर आहेत. अयोध्येत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हाची विशेष पूजा श्रीरामाच्या मंदिरात केली जाणार आहे. विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी यावरून जोरदार टीका केली आहे. यावर प्रतिक्रिया विचारली असता उदय सामंत म्हणाले, ‘ अंबादास दानवे यांना मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलण्याशिवाय पर्याय नाही. कारण अंबादास दानवे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचं वातावरण आहे. शिंदे साहेबांवर टीका करणं त्यांना क्रमप्राप्तच आहे. पण मी शिंदे यांच्या संपर्कात नाही, हे दाखवण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे हे दुसऱ्याचं बघून फक्त टीका करतात. त्याला फार अर्थ नाही… असं उदय सामंत म्हणालेत.
अंबादास दानवे काय म्हणाले होते?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून आज सकाळीच अंबादास दानवे यांनी तीव्र निशाणा साधला. एकनाथ शिंदे हे चोरलेला धनुष्यबाण घेऊन रामाच्या चरणी पूजा करणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी तर पहले मंदिर, फिर सरकार, अशी घोषणा अयोध्येत जाऊन दिली होती. मात्र हे चोरलेला धनुष्यबाण घेऊन जात आहेत. यात काय मर्दुमकी, असा सवाल अंबादास दानवे यांनी केलाय.