वाशिम : अजूनही प्रामाणिकपणा, माणुसकीचा झरा वाहत आहे. एका बाजुला फसवणुकीच्या अनेक घटना घडतात तर दुसरीकडे सामान्यांकडून लाखोंचे ऐवज परत केले जातात. अशा लोकांमुळे प्रामाणिकपणा जिवंत आहे. वाशिम जिल्ह्यातील या घटनेमुळे माणुसकी आणि प्रामाणिकपणा टिकून असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
वाशिम जिल्ह्यातील एरंडा येथील रमेश घुगे यांनी बँकेत दागिने ठेवले होते. त्यांच्या मुलीचे लग्न असल्यामुळे 77 ग्रॅम सोन्याचे दागिने 35 हजार रोख रक्कम घेऊन ते घरी जात होते. परंतु रस्त्यात हे दागिने गहाळ झाली. एकूण आठ लाख रुपयांचा हा ऐवज होता. घरात लग्न आणि त्यासाठी जमवलेली रक्कम व दागिने गहाळ झाल्यामुळे घुगे यांना मोठा धक्का बसला. त्यांनी यासंदर्भात पोलिसात तक्रारही नोंदवली होती. आपले दागिने परत मिळतील, अशी आशा त्यांना नव्हती.
अन् त्यांना मोठा आनंद झाला
रमेघ घुगे यांचे दागिने आणि हरवलेली रक्कम वाशीम शहरातील बाबासाहेब आंबेडकर चौकात कांदा, लसूणचा व्यवसाय करणारे शेख जाहेद यांना मिळाली. त्यांनी माणुसकीचा परिचय दिला. हे सर्व दागिने आणि रोख रक्कम पोलिस ठाण्यात जाऊन जमा केली. पोलिसांनी रमेश घुगे यांना बोलवून त्यांची रक्कम व दागिने परत केले. रक्कम परत मिळताच घुगे यांना मोठा आनंद झाला. त्यांनी शेख हेद यांचे आभार मानले. या घटनेची चर्चा परिसरात झाली. समाजात घुगे यांचे कौतूक होत आहे.