‘धनंजय मुंडे पुण्यात घुसलेत, जमिनीची एवढी भूक का लागली?’; जितेंद्र आव्हाड यांचा खळबळजनक दावा
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे. आव्हाड यांनी मुंडे यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. "धनंजय मुंडे बीडपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. ते आता पुण्यात घुसलेत", असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर खोचक टीका करताना खळबळजनक दावा केला आहे. “धनंजय मुंडे बीडपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. ते आता पुण्यात घुसलेत. माझ्याकडे आणखी एक प्रकरण आलंय. ते संभाजीनगरमध्ये पण गेलेत. मुंडे यांना जमिनीची एवढी भूक का लागलीये की सगळ्या जमिनी हव्या आहेत”, अशी खळबळजनक टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली. “शिवलिंग मोराळे याने अत्यंत फालतू स्टोरी तयार केली आणि माध्यमांना सांगितली. वाल्मिक कराड याच्यावर गुन्हा दाखल आहे हे याला माहिती नव्हतं का? चौकशी अधिकारी आणि वाल्मिक कराड यांचे फोटो आले. तो अधिकारी काय चौकशी करणार? एक अधिकारी 9 वर्षे पदावर आहे. हे मंत्री धनंजय मुंडे यांच्या आशीर्वादाशिवाय होत नाही”, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.
“माझ्या बाजूला एक स्त्री बसली आहे. या शेड्युल कास्टच्या आहेत. त्यांची जमीन राज धनवट याने अडीच एकर खाल्ली. राज धनवट हा धनंजय मुंडे यांचा अत्यंत जवळचा मित्र आहे. बलराज वांजीले पोलीस अधिकारी माझ्याकडे काल आला. त्याने सांगितलं की माझ्यावर चौकशी करताना दबाव आणला. अतिरिक्त महासंचालक असताना संजय सिंघल या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने पत्र दिलं होतं. 9/8/2023 रोजी पत्र दिलं होतं. चौकशी करा. मात्र त्या चौकशीचं काय झालं?”, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला.
‘एखाद्या आरोपीला जातीचा चेहरा लावणं गंभीर’
“धनवट याच्यावर गुन्हा दाखल केला म्हणून 10 पोलीस अधिकाऱ्यांवर लाचलुचपत विभागाची चौकशी लावली. वाल्मिक कराड हा वंजारी समाजाचा चेहरा नाही. एका आरोपीला समाजाचा चेहरा करणं योग्य नाही. प्रत्येक हिंदूला विचारतो तुम्ही एवढे निष्ठुर होऊ शकता का? बीडमधील टिपराट गुंड वाल्मिक कराड हा काय समाजाचा चेहरा आहे काय? एखाद्या आरोपीला जातीचा चेहरा लावणं गंभीर आहे. उद्या जातीजातीत दंगली होतील”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
‘एकटे फडणवीस काम करताना दिसत आहेत’
“सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे ही आमची पक्षाची भूमिका आहे. मी पण वंजारी समाजाचा आहे. पण ज्याच्यावर अन्याय झालाय त्याच्या बाजूने मी उभा राहिलो. मी घाबरलो नाही. 43 जणांचे मंत्रिमंडळ आहे. पण एकटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काम करताना दिसत आहेत”, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.