हे तेच आमदार, सूरतेहून परतले, आदित्य ठाकरेंनी भर सभेत मिठी मारली, फडणवीसांकडे निघालेत, गुन्हा दाखल, राज्याचं लक्ष ‘या’ पदयात्रेकडे!!
एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाऊन सत्ताधारी गटात शामील होण्याची संधी सोडलेले, ठाकरे गटाशी निष्ठावान राहिलेले, राज्यात मोठे चर्चित आमदार नितीन देशमुख यांच्या पदयात्रेकडे आज पुन्हा एकदा महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.
अकोला : महाराष्ट्रात राजकीय (Maharashtra politics) भूकंप घडणवारं एकनाथ शिंदे यांचं ऐतिहासिक बंड सूरत, गुवाहटीतील मुक्कामांमुळे जास्त चर्चेत आलं. शिंदे गटातील आमदार ज्या प्रकारे अचानक गायब झाले, नॉट रिचेबल झाले, नंतर ते मुंबईतून सुरतेला गेल्याचं कळालं. त्यानंतर राज्यभरातील आमदारांचा धांडोळा घेण्यात आला. कोण कोण नॉट रिचेबल आहेत, याच्या याद्या जाहीर झाल्या. सूरतेहून हे आमदार पुढे गुवाहटीत पोहोचले. या सगळ्यात एका आमदाराची चर्चा जास्त झाली. अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे आमदार नितीन देशमुख. जे सूरतेच्या वाटेतून परत फिरले. ठाकरे गटाशी निष्ठावान राहिले. आज नितीन देशमुख पुन्हा एकदा चर्चेत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील निवासस्थानी ते आपला ताफा घेऊन निघालेत. अकोला-अमरावतीतील खाऱ्या पाण्याचा प्रश्न घेऊन. या पदयात्रेत २०० पेक्षा जास्त कार्यकर्ते आहेत. या जिल्ह्यातील खारं पाणी थेट देवेंद्र फडणवीस यांना प्यायला देणार, असा आक्रमक पवित्रा आमदार नितीन देशमुख यांनी घेतलाय.
अकोल्यात गुन्हा दाखल..
अकोल्याहून १० एप्रिल रोजी नागपूरच्या दिशेने आमदार नितीन देशमुख निघाले आहेत. आज ही यात्रा अमरावतीत आहे. २१ एप्रिल रोजी नागपुरात देवेंद्र फडणवीस यांच्या घरी हा ताफा धडकणार आहे. अकोला-अमरावती खार पट्ट्यातील ६९ गावांतील पाणी एका टँकरमध्ये भरण्यात येतंय. प्रत्येक गावातील महिला स्वतःच्या हातानी या टँकरमध्ये पाणी टाकतायत. हा टँकर घेऊन आमदार देशमुख यांचा ताफा नागपूरच्या दिशेने निघालाय. मात्र अकोल्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झालाय. जमावबंदीचा नियम झुगारणे तसेच पदयात्रेला परवानगी न घेणे यामुळे गुन्हा दाखल झालाय. त्यामुळे आमदार नितीन देशमुख यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. नागपुरच्या दिशेने निघालेला हा ताफा वाटेत अडवला जातोय का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
मटक्यांना परमिशन आहे का?
अकोल्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आमदार देशमुख यांनी संताप व्यक्त केलाय. आम्ही रीतसर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं. पैदल चाणाऱ्यांना परमिशनची गरज काय? शहरांत मटके चालतात, त्यांना परमिशन आहे का… गृहमंत्र्यांसोबत ५ पेक्षा जास्त कार्यकर्ते असतील त्यांच्याविरोधात जिल्हा पोलीस अधीक्षक गुन्हे दाखल करतील का… असा सवाल नितीन देशमुख यांनी उपस्थित केलाय. अकोल्यात दंगल घडली की कोरोनाचे पेशंट वाढले, जमावबंदीचे कारण काय, असा सवालही देशमुख यांनी केला.
आदित्य ठाकरेंनी भर सभेत..
सूरतेतून परत आलेल्या आमदार नितीन देशमुख यांच्यावरून राज्यात मोठी चर्चा रंगली होती. नितीन देशमुख यांनी मला बळजबरीने सूरतेला नेत होते, पण मी वाटेतून माघारी फिरलो असा आरोप केला होता. तर आम्ही स्वतः नितीन देशमुख यांना त्यांच्या इच्छेनुसार सन्मानपूर्वक माघारी पाठवलं, असा दावा एकनाथ शिंदे गटाकडून करण्यात आला होता. पण परतलेल्या नितीन देशमुखांना आदित्य ठाकरे यांनी अकोला येथील शेतकरी मेळाव्यात भर सभेत मिठी मारली होती.
पन्नाशीचे आमदार नितीन देशमुख यांनी आदित्य ठाकरेंना पदस्पर्श करण्याचा प्रयत्न केला, यावरूनही चर्चा झाली. ‘तुझे बाबा विकले गेले असते, खोके मिळाले असते.. आजचा दिवस चांगला की तसा.. ‘ असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी नितीन देशमुख यांच्या मुलाला विचारला होता. त्यावर त्याने आजचा दिवस चांगला असं उत्तर दिलं होतं. एकूणच एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाऊन सत्ताधारी गटात शामील होण्याची संधी सोडलेले, ठाकरे गटाशी निष्ठावान राहिलेले, राज्यात मोठे चर्चित आमदार नितीन देशमुख यांच्या पदयात्रेकडे आज पुन्हा एकदा महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.