बच्चू कडू तिसऱ्या आघाडीतून ‘यू टर्न’ घेऊन ‘वर्षा’वर सरेंडर होणार? कोणी केला मोठा दावा
लोकसभा निवडणुकीत बच्चू कडू यांच्यामुळे मतांचे विभाजन झाले होते. त्याच्यामुळे युतीच्या उमेदवारास फटका बसला. तिसरा आघाडीच्या माध्यमातून बच्चू कडू मांडवली करून चुपचाप बसले आहेत. दुसरीकडे ते एकनाथ शिंदेंना पाठिंबा मागत आहे.
विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आता कधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक असलेले आमदार बच्चू कडू महायुतीच्या विरोधात उतरले आहे. त्यांनी राज्यात तिसरी आघाडी निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ४ नोव्हेंबर रोजी राज्यातील राजकारणात मोठा भूकंप होईल, असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. आता बच्चू कडू यांच्यावर त्यांच्या जिल्ह्यातील विरोधक आणि अपक्ष पण भाजप समर्थक आमदार रवी राणा यांनी हल्ला केला आहे.
तिसरी आघाडी फ्लॉप होणार
आमदार रवी राणा यांनी आमदार बच्चू कडू यांच्यावर हल्लाबोल केला आहे. बच्चू कडू यांच्या तिसऱ्या आघाडीच्या प्रयोगावर आमदार राणा यांनी टीकेचा आसूड ओढला आहे. बच्चू कडू यांची तिसरी आघाडी पूर्णपणे फ्लॉप होणार आहे, असा दावा त्यांनी केला आहे.
बच्चू कडू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना म्हणतात की, अचलपूरमध्ये मला पाठिंबा द्या. मेळघाटमध्ये राजकुमार पटेल यांना पाठिंबा द्या. परंतु काही दिवस थांबा. बच्चू कडू कधी पण तिसरी आघाडीतून ‘यू टर्न’ घेऊन वर्षा बंगल्यावर सरेंडर होतील, हे तुम्हाला दिसणार आहे.
लोकसभेत बच्चू कडूंमुळे मतविभाजन
लोकसभा निवडणुकीत बच्चू कडू यांच्यामुळे मतांचे विभाजन झाले होते. त्याच्यामुळे युतीच्या उमेदवारास फटका बसला. तिसरा आघाडीच्या माध्यमातून बच्चू कडू मांडवली करून चुपचाप बसले आहेत. दुसरीकडे ते एकनाथ शिंदेंना पाठिंबा मागत आहे. गेल्या वीस वर्षांत बच्चू कडू यांच्या मतदार संघात विकास कामे झाले नाही. ते गारुडी असणारे व्यक्तीमत्व आहे, असा दावा आमदार रवी राणा यांनी केला.
काय म्हणाले बच्चू कडू
आमदार बच्चू कडू यांनी राज्यातील राजकारणात ४ नोव्हेंबरला भूंकप होणार असल्याचा दावा केला. अनेक चांगले उमेदवार आमच्याकडे येणार आहेत. युती आणि आघाडी या दोघांना आम्ही पराभूत करणार आहोत. सर्वत्र तिसऱ्या आघाडीचा डंका दिसणार आहे, असे बच्चू कडू यांनी म्हटले होते.