आमदार रवींद्र धंगेकर भडकले, म्हणाले त्यांना अस्तित्व दाखवायचं आहे म्हणुनच…
केंद्र आणि राज्य सरकारकडून खोटे अनुदान आणि खोट्या घोषणा दिल्या जातात. केंद्र सरकार जनेतेच्या तोंडाला पाणी पुसत आहे. राज्यातील तलाठी भरती परीक्षेतही गोंधळ आहे. प्रत्येक भरतीवेळी हा घोळ घातला जातो.
पुणे : 21 ऑगस्ट 2023 | विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी विधान भवनात घेतलेल्या एका बैठकीवरून पुण्यातील कॉंग्रेस आमदार रवींद्र धंगेकर चांगलेच संतापले आहेत. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी बैठक घेतली. या बैठकीला रवींद्र धंगेकर यांना आमंत्रित केले नाही. यावरून धंगेकर यांनी उपसभापती गोऱ्हे यांच्यावर टीका केली. याचवेळी धंगेकर यांनी कांदा प्रश्नावरून राज्यसरकारवरही टीका केली. राज्यात कांदा प्रश्न पेटला आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्कात 40 टक्के वाढ केली आहे. त्यामुळे कांदा निर्यात कमी होणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकरी आणि कांदा व्यापारी अडचणीत आले आहेत. केद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात शेतकरी आंदोलनाच्या तयारीत आहेत.
त्यावर प्रतिक्रिया देताना आमदार धंगेकर यांनी ‘हे सरकार शेतकऱ्यांचे आणि जनतेचे सरकार नाही. हे फक्त महागाईचे सरकार आहे. केंद्र सरकार तर त्रासदाई सरकार असून येत्या निवडणुकीत जनता त्यांना धडा शिकवेल, असा इशारा त्यांनी दिला.
केंद्र आणि राज्य सरकारकडून खोटे अनुदान आणि खोट्या घोषणा दिल्या जातात. केंद्र सरकार जनेतेच्या तोंडाला पाणी पुसत आहे. राज्यातील तलाठी भरती परीक्षेतही गोंधळ आहे. प्रत्येक भरतीवेळी हा घोळ घातला जातो. राज्य सरकारची यंत्रणा सक्षम नाही. हे तर राज्य सरकारचे अपयश आहे, अशी टीकाही धंगेकर यांनी केली.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याबाबत राज्याचे मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जे काही विधान केले. ते चुकीचे आहे. ज्यांना मी आयुष्यभर सहकार्य केलं. मदत केली त्यांनी ते लक्षात ठेवलं पाहिजे. पवार साहेबांचे परवाच्या सभेचे वाक्यच त्यांना उत्तर देण्यासाठी पुरेसं आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी विधान भवनात पुण्यातील गणेशोत्सव संदर्भात बैठक घेतली. पुण्यात अशी बैठक पहिल्यांदाच घेण्यात आली. त्यामुळे त्यांनी या बैठकीला सगळ्यांना बोलवायला हवं होत. मला बोलवायला हवं होत. विधान भवनात बैठक घेणे हे चुकीचे असून त्यांनी चुकीचा पायंडा पाडला असे ते म्हणाले.
पुण्यातील गणेशोत्सव आणि नीलम गोऱ्हे यांचा संबंध काय? असा सवाल करून ते म्हणाले, नीलम गोऱ्हे या गणेशोत्सवात फक्त राजकारण करत आहेत. त्यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांना आपले अस्तित्व दाखवायचे आहे. त्यासाठी असा त्यांचा प्रयत्न असल्याची टीका आमदार धंगेकर यांनी केलीय.