Rohit Pawar | ‘आम्ही 80 च्या पुढे जाऊ, तेव्हा तू…’, अजित पवार यांच्या बंडावर रोहित पवार यांनी दिलं घरातलं उदहारण
Rohit Pawar | अजित पवार यांच्या बंडानंतर रोहित पवार यांना त्यांच्या आई-वडिलांनी एक प्रश्न विचारला. रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यात ते बऱ्याच विषयांवर बोलले.
पुणे : “भाजपाने योग्य पद्धतीने डाव खेळलाय. बाळासाहेबांनी मराठी अस्मिता जपण्यासाठी शिवसेना पक्ष काढला. पण भाजपाने तो पक्ष फोडला. भाजपाच्या विरोधात महाराष्ट्रात, देशात वातावरण आहे. त्यावर कोणी बोलू नये, नेत्यांनी आपसात गुंतून रहाव यासाठी त्यांनी आधी उद्धव ठाकरे यांची पार्टी फोडली आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला. आम्ही आपसात उत्तर देतोय, भाजपा बाजूला राहतय” असं रोहित पवार म्हणाले.
“नाशिकमध्ये पोस्टर बघितले, त्यावर अजितदादांचा फोटो नव्हता. अजित दादांना चार-पाच लोक विलन करतायत. दादांचा निर्णय आम्हाला, लोकांना पटलेला नाही. भाजपा मस्तपणे एसीमध्ये बसून मजा बघतेय. आम्ही आपसात भांडतोय. कुटुंब, पार्टी, कोणी फोडली हे लोकांना माहित आहे. लोक हे कुठेही विसरणार नाहीत” असं रोहित पवार म्हणाले.
रोहित पवार यांना त्यांच्या आई-वडिलांनी काय प्रश्न विचारला?
“निर्णय घेताना, आम्ही विकासासाठी निर्णय घेतला असं बोलतात. पण पदं होती, तेव्हा विकास केला नाही?. ही स्वाभिमान, अस्मितेची लढाई आहे. एका विचाराची लढाई आहे” असं रोहित पवार म्हणाले. “जेव्हा या घडामोडी घडत होत्या, तेव्हा माझ्या आई-वडिलांनी मला एकच प्रश्न विचारला. जेव्हा आम्ही वयस्कर होऊ, 80 च्या पुढे जाऊ, तेव्हा तू अशीच भूमिका घेशील का? जर माझ्या आई-वडिलांना हा प्रश्न पडला असेल, तर सामान्य कुटुंबातील अनेक आई-वडिलांना हा प्रश्न पडला असणार” असं रोहित पवार म्हणाले. “मी माझी भूमिका घेतली. आजोबांबरोबर राहण्याचा निर्णय घेतला. जे चाललय ते योग्य आहे का? असा प्रश्न महाराष्ट्रातील तमाम जनतेला पडला आहे. महाराष्ट्रातील जनता हे सर्व व्यक्तीगत पातळीवर घेत आहे” असं रोहित पवार म्हणाले.