11 जागा आणि उमेदवार 12, विधान परिषदेत उबाठाचे मिलिंद नार्वेकर कुणाचा पत्ता कट करणार ?
विधान परिषदेत जागा 11आणि उमेदवार 12 आहेत, त्यामुळे एकाचा पराभव होणे अटळ आहे. तो पराभव नेमका कोणाचा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नुकताच महाविकास आघाडीचा तिसरा उमेदवार निवडून आला तर तो मोठा विजय ठरणार आहे. विधान परिषदेत गुप्त मतदान होणार असल्याने आमदार फूटू शकतात हा इतिहास आहे.
महाराष्ट्रातील विधान परिषदेतील निवडणूकांमध्ये रंगत आली आहे. येत्या 12 जुलै रोजी निवडणूका आहेत. याच तारखेला या निवडणूकांचे निकाल जाहीर होणार आहेत. या निवडणूकीत भाजतीय जनता पार्टीने पाच जणांची नावे जाहीर केली आहेत. पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर केली आहे. शुक्रवारी उमेदवारांचे नाव मागे घेण्याची शेवटची संधी होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी त्यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांनी आयत्यावेळी उतरवून या निवडणूकांमध्ये रंगत आणली आहे. सध्याच्या 11 विधान परिषद आमदारांचा कार्यकाल 27 जुलै रोजी संपणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने माजी खासदार भावना गवळी तसेच कृपाल तुमाने यांना मैदानात उतरविले आहे. तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांना उतरविले आहे.महाविकास आघाडीतील कॉंग्रेसने सध्याच्या विधान परिषद सदस्य प्रज्ञा सातव यांना पुन्हा तिकीट दिले आहे. शरद पवार गटाने शेकापचे उमेदवार जयंत पाटील यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे जागा 11 आणि उमेदवार 12 त्यामुळे एकाचा पराभव होणे अटळ आहे. तो पराभव नेमका कोणाचा होणार याकडे लक्ष लागले आहे.
महायुतीकडून एकूण 9 आणि महाविकास आघाडीतून 3 उमेदवार उतरविण्यात आले आहेत. भाजपाकडे 103 आमदार आहेत. त्यामुळे त्यांचे उमेदवार निवडून येतील. परंतू एकाचा पराभव अटळ आहे. तो कोणत्या पक्षाचा होणार यात पुढील राजकीय समीकरणे ठरणार आहेत. राज्यात 288 आमदार आहेत, त्यातील 274 आमदार मतदान करतील, पहिल्या फेरीत 23 मते मिळाली तो आमदार जिंकणार आहे. दुसर्या फेरीत देखील मते मिळाली तरी तो आमदार निवडून येऊ शकतो. त्यामुळे एका विधान परिषदेतील उमेदवाराला जिंकण्यासाठी विधान सभेतील 23 आमदारांची मते लागणार आहेत.
भाजपाकडे 103, शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडे 37, अजित पवार यांच्या एनसीपीचे 40, कॉंग्रेस 37, शिवसेना उबाठाकडे 15 आणि एनसीपी शरद पवार गटाचे 10 आमदार आहेत. प्रहार जनशक्ती, बीवीए, समाजवादी पार्टी आणि एआयएमआयएम कडे प्रत्येकी दोन, जनसूराज्य, आरएसपी, शेकाप, एमएनएस, सीपीएम, स्वाभिमानी पक्ष, क्रांतिकारी क्षेत्र पार्टी पक्षाचे प्रत्येकी एक-एक आमदार आहेत. तसेच 13 अपक्ष आमदार देखील आहेत.या अपक्षांना स्वत:कडे खेचण्याकडे कोणता पक्ष यशस्वी होतो यावर उमेदवारांचा विजय अवलंबून आहे.
दोन वर्षांपूर्वी काय झाले होते
उद्धव ठाकरे यांचे विश्वासार्ह मिलिंद नार्वेकर यांच्या विजयाची खात्री असल्याशिवाय त्यांना उद्धव ठाकरे उभे करणारच नाहीत असे म्हटले जात आहे. त्यामुळे ठाकरे यांच्या चालीमुळे नवा ट्वीस्ट तयार झाला आहे. दोन वर्षांपूर्वी याच महिन्यात झालेल्या विधान परिषद निवडणूकांत कॉंग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे पडले होते. त्यांचा फायदा झाला ते राज्यसभेवर गेले आहेत. गेल्यावर्षी कॉंग्रेसच्या आमदारांनी गद्दारी केली होती. परंतू त्यानंतरच एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करीत महाविकास आघाडीचे सरकार पाडले होते. त्यामुळे यंदा कोणाचा मोहरा कामी येतो याकडे लक्ष लागले आहे. बच्चू कडू कोणाच्या बाजूने आहेत हे कळलेले नाही. महाविकास आघाडीचे तीन उमेदवार निवडून येतील असे म्हटले जात आहे. जर मिलिंद नार्वेकर निवडून आले तर महायुतीचा उमेदवार पडेल. तर ते हारले तर उबाठाची मोठी हार होईल म्हणून या निवडणूकीकडे लक्ष लागले आहे.