शरद पवार गटाचा उमेदवार अडचणीत, लोकसभेसाठी उमदेवारी जाहीर होताच कारवाईचा बडगा
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. भिवंडी मतदारसंघातून सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली . मात्र याचसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण सात उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. भिवंडी मतदारसंघातून सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली . मात्र याचसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर होताच सुरेश म्हात्रे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. म्हात्रे यांच्या गोदामांवर एमएमआरडीएकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. येवई येथील आर के लॉजी पार्क येथील गोदाम बांधकामांवर कारवाई करण्यासाठी एमएमआरडीएचे अधिकारी पुढे सरसावले आहेत.
भिवंडी लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांची उमेदवारी गुरुवारी जाहीर करण्यात आली.म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर त्यांच्या गोदामांवर एमएमआरडीएकडून कारवाई करण्याचा घाट घालण्यात सुरुवात झाली आहे. मात्र या कारवाईवर प्रतिक्रिया देताना सुरेश म्हात्रे यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. ‘ संपूर्ण तालुक्यातील गोदाम बांधकामांना संरक्षण देण्यासाठी शासनाने अध्यादेश काढले आहेत. त्यानुसार सर्व बांधकाम संरक्षित करण्यासाठी प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे व उच्च न्यायालयातून स्थगिती आदेश घेतले आहेत’ असे स्पष्टीकरण सुरेश म्हात्रे यांनी दिले आहे.
मी उभ्या केलेल्या गोदाम व्यवसायातून 90 हजार युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला. तालुक्यात अनधिकृत गोदाम व्यवसाय भ्रष्ट्राचाराची जननी कपिल पाटील हेच आहेत, असा आरोप म्हात्रे यांनी केला. राजकीय दबावातून एमएमआरडीए ही कारवाई करत आहे. ‘जिनके घर शीशे के होते है, वो दुसरों के घर पर पत्थर नहीं फेका करते’ असे म्हणत सुरेश म्हात्रे यांनी भाजपा उमेदवार कपिल पाटील यांच्या वर पलटवार करत इशारा दिला.
बाळ्या मामाच्या तिकीटावर काँग्रेसचा आक्षेप !
दरम्यान सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना राष्ट्रवादीकडून जाहीर करण्यात आलेल्या तिकीटावर काँग्रेसने आक्षेप नोंदवला आहे. भिवंडी लोकसभा मतदासंघावरून काँग्रेस राष्ट्रवादी आमनेसामने आली आहे. आमच्या पक्षाकडून अजून अधिकृत यादी जाहीर झाली नाही. आम्हाला यासंदर्भात वरिष्ठांकडून सूचना देण्यात आल्यानंतर आम्ही काय भूमिका घ्यायची ते ठरवू, असे कल्याण जिल्हा अध्यक्ष सचिन पोटे म्हणाले.