मनसेकडून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची सहावी यादी जाहीर, कुणाकुणाला संधी?
मनसेकडून उमेदवारांची सहावी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण 32 नावांचा समावेश आहे. विशेष म्हणजे मनसेकडून आतापर्यंत एकूण 110 मतदारसंघांसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यापैकी माहीमच्या जागेबाबत मोठा सस्पेन्स निर्माण झाला आहे. कारण या जागेवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची सहावी यादी जाहीर करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वत: ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. मनसेकडून जाहीर करण्यात आलेल्या सहाव्या यादीत एकूण 32 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. या यादीत नाशिक पूर्वमधून प्रसाद सानप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच देवळाली मतदारसंघातून मोहिनी जाधव, नाशिक मध्यमधून अंकुश पवार, जळगाव ग्रामीणमधून मुकुंदा रोटे, विलेपार्ले मतदारसंघातून जुईली शेंडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच कल्याण पश्चिममधून उल्हास भोईर, उल्हासनगरमधून भगवान भालेराव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
राज ठाकरे यांनी डोंबिवलीत कार्यक्रमात आमदार राजू पाटील आणि अविनाश जाधव यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली होती. या यादीत राजू पाटील आणि अविनाश जाधव यांचंदेखील नाव होतं. या यादीत एकूण 45 उमेदवारांची नावे होती, त्यानंतर तिसऱ्या यादीत 13, चौथ्या यादीत 5, पाचव्या यादीत 15, सहाव्या यादीत 32 असे एकूण आतापर्यंत 110 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
वाचा मनसेच्या सहाव्या यादीतील उमेदवारांची नावे
अमित ठाकरे यांना उमेदवारी, महायुती पाठिंबा देणार?
मनसेकडून माहीम मतदारसंघातून राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पण ही जागा शिवसेनेची पारंपरिक जागा आहे. या जागेवर शिवसेनेचे सदा सरवणकर गेल्या अनेक वर्षांपासून आमदार आहेत. मनसेने अमित ठाकरे यांना या जागेवर उमेदवारी दिल्याने भाजपकडून सदा सरवणकर यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न केले आहेत. सरवणकर यांनी माघार घ्यावी, अशी भाजपची भूमिका आहे. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिल्याने सदा सरवणकर यांनी युती धर्माचं पालन करुन अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्याचं आवाहन केल्याची माहिती आहे. पण सदा सरवणकर आपल्या उमेदवारीवर ठाम आहेत. त्यामुळे माहीम मतदारसंघाबाबतचा सस्पेन्स वाढला आहे.