फाईल उघडली म्हणून मोदींना पाठिंबा दिला का?; राज ठाकरे कुणावर बरसले?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी मोदींना पाठिंबा दिल्यानंतर महायुतीला निवडणुकीत कसं सहकार्य करायचं याची चर्चा झाली. महायुतीच्या नेत्यांना मनसे पदाधिकाऱ्यांची यादी दिली जाणार आहे. ही यादी तयार करण्याचे आदेशही राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरे यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. तसेच मोदींना पाठिंबा का दिला? याचं विश्लेषणही केलं. यावेळी त्यांना सरकारने तुमची फाईल उघडली म्हणून तुम्ही भाजपला पाठिंबा दिल्याचा आरोप होत असल्याकडे लक्ष वेधलं. त्यावर राज ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. ज्यांना कावीळ झालेली असते, त्यांना जग पिवळेच दिसते, असा जोरदार हल्ला राज ठाकरे यांनी चढवला आहे.
राज ठाकरे यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांचं लक्ष खासदार संजय राऊत यांच्या टीकेकडे वेधण्यात आलं. फाईल उघडली म्हणून त्यांनी मोदींना पाठिंबा दिल्याचं राऊत म्हणाले होते. त्याबाबत विचारताच राज ठाकरे यांनी राऊत यांच्यावर नाव न घेता हल्ला चढवला. ज्यांना कावीळ झालेली असते त्यांना जग पिवळे दिसते. ते आताच बाहेर आले आहेत. त्यामुळे त्यांचा विचार तसा असू शकतो, असा हल्ला राज ठाकरे यांनी चढवला.
आता सांगता येत नाही
मनसेने महायुतीला पाठिंबा दिल्यानंतरही मनसेच्या नावावर शिवाजी पार्कचं मैदान बुक आहे. या ठिकाणी सभा होणार आहे का? असा सवाल राज यांना करण्यात आला. त्यावर, शिवाजी पार्क बुक केलेले आहे. निवडणूक काळात अशा तारखा बुक केल्या जातात. निवडणूक काळात असं करावं लागतं. सभा होईल, नाही होईल हे आता सांगता येत नाही, असंही ते म्हणाले.
कोण पदाधिकारी?
भाजपला पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. त्याकडेही त्यांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावर त्यांनी थेट कोण पदाधिकारी? असा सवाल केला. एकच ना… मी या सर्व गोष्टींचा विचार करताना पक्षाचा म्हणून विचार करतो. ज्यांना या प्रकारची समज आणि उमज नसेल त्यांनी जो निर्णय घ्यायचा तो घ्यावा, असं राज यांनी थेट सांगितलं.
महायुतीला यादी देऊ
महायुतीच्या लोकांनी किंवा उमेदवारांनी आमच्या कोणत्या लोकांशी संपर्क साधायचा? कुणाशी बोलायचं? आणि पुढे कशाप्रकारे जायचं? त्याची यादी दोन दिवसात तयार होईल. ही यादी महायुतीला दिली जाईल. महायुतीचे लोक आमच्या पदाधिकाऱ्यांना मानाने वागवतील अशी आशा आहे. कुणाशी संपर्क साधायचा याचा घोळ नको म्हणून यादी देऊ. त्यांनाही सोयीस्कर जाईल. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी महायुतीला पूर्णपणे सहकार्य करायचं आहे. महायुतीचा पूर्ण प्रचार करायचा आहे. महायुतीने आमच्या लोकांशी संपर्क साधल्यावरच प्रत्यक्ष काम सुरू होईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.