Raj Thackeray : धर्म, स्मशानभूमी, अंत्यसंस्कार यावर राज ठाकरे काय म्हणाले?
Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पदाधिकारी मेळाव्यात बोलताना एका गोष्टीकडे लक्ष वेधलं. त्यांनी त्यांच्या भाषणात धर्म, प्रथा, परंपरा या बद्दल महत्त्वाच भाष्य केलं.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वांद्रे रंगशारदा येथे पदाधिकाऱ्यांचा राज्यस्तरीय मेळावा सुरु आहे. या मेळाव्याला राज ठाकरे यांनी मार्गदर्शन केलं. या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी धर्म, प्रथा, परंपरा या बद्दल महत्त्वाच भाष्य केलं. “काही गोष्टी अशा आहेत, तेव्हा परंपरा, प्रथा म्हणून पडलेल्या असतील. पण त्यात आता राज्य सरकार केंद्र सरकारने जातीने लक्ष घालणं गरजेच आहे. बेसुमार जंगलतोड होतेय. पाऊस पडत नाहीय. मराठवाड्यावरच्या रिपोर्टबद्दल मी मागे बोललो होतो. सध्या पाण्याच जे मराठवाड्यात सुरु आहे, ते असच सुरु राहिलं, तर पुढच्या 30-40 वर्षात मराठावाड्याच वाळवंट होईल. मराठवाड्याच वाळवंट झाल्यानंतर, पुन्हा पूर्वीसारखी परिस्थिती आणण्य़ासाठी 150 ते 200 वर्ष लागतील” असं राज ठाकरे म्हणाले.
“देशात बेसुमार जंगलतोड सुरू आहे. हजारो एकर जमिनीची जंगलतोड सुरू आहे. मी आल्यावर या गोष्टींचा विचार करत होतो. आपल्यातील काही गोष्टी सुधारणं गरजेचं आहे. या देशात बेसूमार जंगलतोड होते, ती कशासाठी होते. आपल्याकडे होळी आली की सांगतो जंगलतोड करू नका. आपण आपल्या धर्माकडे पाहिलं पाहिजे. जेव्हा आपल्या धर्मातील हजारो लोकं मरतात तेव्हा त्यांचे अंत्यसंस्कार लाकडाने होतो. त्यासाठी जंगलतोड होते. लाकडाचा सर्वाधिक वापर स्मशानभूमीत होतो” असं राज ठाकरे म्हणाले.
‘त्याशिवाय ही गोष्ट थांबणार नाही’
“विद्यूत दाहिनीत आपण अंत्यसंस्कार करत नाही. ते प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यामुळे जंगलतोड थांबवली पाहिजे. काही गोष्टी आपण बदलल्या पाहिजेत. ज्यांच्याकडे जंगलं आहेत, ते लोक जमिनीखाली माणसं पुरत आहेत आणि आपण राजरोस जंगलतोड करत आहोत. सरकारने विद्युत दाहिन्यांचं प्रमाण वाढवलं पाहिजे. त्याशिवाय ही गोष्ट थांबणार नाही” असं राज ठाकरे म्हणाले.