अकोल्यातील मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू, पोस्टमार्टम रिपोर्टमधून खळबळजनक माहिती समोर
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांमधील एक असलेल्या जय मालोकरच्या मृत्यू प्रकरणाला आता नवं वळण लागलं आहे. कारण जय मालोकर या तरुणाचा मृत्यू हा हृदय विकाराच्या झटक्याने नाही तर मारहाणीमुळे झाल्याची माहिती पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आली आहे.
अकोल्यातील मनसे कार्यकर्ता जय मालोकर याचा मृत्यू हृदय विकाराच्या झटक्याने नाही तर मारहाणीमुळे झाल्याची माहिती आता पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवरील हल्ल्यानंतर मनसे कार्यकर्ता जय मालोकर याला मारहाण झाली होती. या मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आली आहे. विशेष म्हणजे जय मालोकरचा मृत्यू झाला त्यावेळी त्याला हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने मृत्यू झाल्याचा दावा केला जात होता. पण तो दावा खोटा होता का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. तसेच जय मालोकर याचा मारहाणीमुळे मृत्यू झाला असेल तर त्याला मारहाण कोणी केली? हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे.
मनसे कार्यकर्ता जय मालोकर याच्या मृत्यू प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे. जय मालोकर याचा पोस्टमार्टम रिपोर्ट आता समोर आला आहे. या रिपोर्टमध्ये जय मालोकर याचा मृत्यू जबर मारहाणीमुळे झाल्याचा म्हटलं आहे. जय मालोकरच्या पाठीवर, छातीवर, डोक्यावर आणि मानेवर जबर मारहाण झाल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. तसेज मारहाण इतकी भयानक करण्यात आली होती की, जय मालोकर याच्या छातीच्या चार ते पाच बरगड्या मागच्या बाजूने फ्रॅक्चर होत्या. तसेच डोक्याला देखील गंभीर मारहाण झाली आहे. पोस्टमार्टमवेळी जयच्या मेंदूला सूज होती, त्यामुळे त्याच्या मेंदूचं वजन वाढलं. मानेवर जबर मारहाणीमुळे त्याच्या मज्जातंतूंना गंभीर इजा झाल्याचं अहवालात म्हटलं आहे. या घटनेमुळे न्युरोजेनिक शॉकमुळे त्याचा मृत्यू झाल्याचं अहवालात म्हटलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहाबाहेर 30 जुलैला मनसे कार्यकर्ते आणि अमोल मिटकरी यांच्यात जोरदार राडा झाला होता. मनसे कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या अमोल मिटकरींची गाडी फोडली होती. यानंतर गुन्हा दाखल झालेल्या वीस कार्यकर्त्यांपैकी जय मालोकारचा मृत्यू हृदयविकारानं झाल्याचा दावा करण्यात आला होता. जय हा मनसेच्या विद्यार्थी सेनेचा जिल्हा उपाध्यक्ष होता. तो परभणी येथे होमिओपॅथी अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षाला होता. मिटकरींसोबत झालेल्या राड्याच्या ताणातूनच जयचा मृत्यू झाल्याचा आरोप मनसेने केला होता.
जयच्या मृत्यूनंतर मनसे राज ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरेंनी अकोल्यात त्याच्या कुटुंबियांची भेट घेतली होती. राडा झाल्यानंतरच्या तीन तासांत जयसोबत नेमकं काय झालं होतं?, याची चौकशी करण्याची जयच्या कुटूंबियांनी मागणी केली होती. या प्रकरणाची सीबीआयच्या माध्यमातून उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी कुटूंबियांनी राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे केली आहे. कुटूंबियांच्या जीवाला धोका असल्याची भिती मालोकार कुटूंबियांनी व्यक्त केली आहे.