MNS : ‘तेव्हा बाळासाहेब देशाचे एरवी ते फक्त तुमचे…’, मनसेचा उद्धव ठाकरेंना सवाल
MNS : काल उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी एका पत्रकाराने त्यांना मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्याच्या पोस्टरवर बाळासाहेबांचा फोटो आहे, त्या विषयी प्रश्न विचारला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा येत्या 30 तारखेला रविवारी गुढी पाडवा मेळावा आहे. दरवर्षी दादरच्या शिवाजी पार्क मैदानात या दिवशी मनसेची भव्य सभा होते. यंदा सुद्धा गुढी पाडवा मेळाव्याला राज ठाकरेंच भाषण होणार आहे. राज ठाकरे भाषणात काय बोलतात? विरोधकांचा कसा समाचार घेतात? याची उत्सुक्ता आहे. राज्यात औरंगजेबाची कबर, कुणाल कामरा, दिशा सालियान हे विषय गाजत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे या विषयावर काय बोलतात? त्यांची भूमिका काय असणार? मनसेची भविष्याची दिशा काय असेल? ते राज ठाकरे यांच्या भाषणातून स्पष्ट होईल. याच मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्याच एक पोस्टर चर्चेचा विषय ठरलं आहे.
दादर शिवाजी पार्क भागात मनसेन गुढी पाडवा मेळाव्याच एक पोस्टर लावलं आहे. त्यावर दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे. काल उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी एका पत्रकाराने त्यांना मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्याच्या पोस्टरवर बाळासाहेबांचा फोटो आहे, त्या विषयी प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी “बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वावाचून पर्याय नाही हेच त्यातून दिसतं आहे. जर महाराष्ट्र जिंकायचा असेल तर बाळासाहेबांचा फोटो वापरावा लागेल. या गद्दारांनीही बाळासाहेब ठाकरेंचा फोटो वापरलाच होता. त्याशिवाय काही पर्यायच उरलेला नाही” असा टोला उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना लगावला.
मनसेन काय उत्तर दिलं?
आता मनसेकडून उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला उत्तर देण्यात आलं आहे. “माननीय बाळासाहेबांचा फोटो होर्डिंग वर लावणे हे पक्षाचं धोरण नाही. एखाद्या उत्साही कार्यकर्त्याची भावना असू शकते, पण श्री उद्धव ठाकरेंना माझा प्रश्न आहे, महापौर बंगला घशात घालायचा होता, तेव्हा बाळासाहेब देशाचे एरवी ते फक्त तुमचे वडील असं कस काय ?” असा सवाल संदीप देशपांडे यांनी विचारला आहे.