मनसेच्या मिसळ पार्टीत नाराजीची ‘फोडणी’, कार्यकर्त्यांचा जाहीरपणे नाराजीचा पाढा
MNS in nashik: आपण आपली भूमिका यापूर्वी अमित ठाकरे यांच्यापुढे मांडली होती. पक्षातील परिस्थिती त्यांना लक्षात आणून दिली होती. त्यामुळे शहरात पक्ष वाढत नाही, असे सांगितल्याचे मनसे कार्यकर्ते कॅमेऱ्यासमोर सांगताना दिसत आहे.

लोकसभा निवडणुकीचे पाचही टप्पे राज्यात पूर्ण झाले आहेत. या निवडणुकीचा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. परंतु या निवडणूक निकालापूर्वी वाद आता चव्हाट्यावर येत आहे. नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मिसळ पार्टीत नाराजी जाहीर झाली आहे. नाशिकमध्ये मनसे कार्यकर्त्यांची मिसळ पार्टी लोकसभा निवडणुकीनंतर बोलवण्यात आली होती. यावेळी मिसळ पार्टीच्या निमित्ताने जमलेल्या दोनशेहून अधिक कार्यकर्त्यांनी नाराजीचा पाढा वाचला. त्यावेळी कार्यकर्त्यांनी वरिष्ठ नेत्यांवर आरोप केला.
पेन ड्राईव्ह राज ठाकरेंना देणार
लोकसभा निवडणुकीत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला खर्चाला ही पैसे नसल्याची ओरड झाली. मोजक्या पदाधिकाऱ्या व्यतिरिक्त फिल्डवर काम करणारे कार्यकर्ते नाराज आहे. त्यांना प्रक्रियेपासून वंचीत ठेवल्याची भावना मिसळ पार्टीत मांडण्यात आली. कार्यकर्त्यांनी आपल्या भावनांचे रेकॉर्डिंग कॅमेरामध्ये केले. त्यानंतर नाराज कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रियांचा पेन ड्राईव्ह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिला जाणार आहे.
वरिष्ठांवर उघड नाराजी
पक्षातील स्थानिक पदाधिकाऱ्यांना बाजूला ठेवत ठराविक कार्यकर्त्यांची मिसळ पार्टी आयोजित करण्यात आली होती. या मिसळ पार्टीत पदाधिकाऱ्यांच्या कारभाराविषयी उघड नाराजी व्यक्त करण्यात आली. पक्षात गटातटाचे राजकारण सुरु आहे. जातीपातीचे राजकारण सुरु आहे. सिडकोच्या व्यक्ती मनसेत प्रवेश करत असेल तर त्याला दुसऱ्या भागात घेऊन प्रवेश दिला जात आहे. माजी शहराध्यक्षांनी अशी कामे केली आहे. त्याच्यामुळे लोक नाराज होत आहे. तसेच कार्यकर्त्यांची मने दुखवण्याचे कामे वरिष्ठांनी केले आहे. यामुळे पक्षाला गळती लागली आहे. इतर पक्ष विचारत नाही, अशी भावना उघडपणे कार्यकर्त्यांनी मांडली.




आपण आपली भूमिका यापूर्वी अमित ठाकरे यांच्यापुढे मांडली होती. पक्षातील परिस्थिती त्यांना लक्षात आणून दिली होती. त्यामुळे शहरात पक्ष वाढत नाही, असे सांगितल्याचे मनसे कार्यकर्ते कॅमेऱ्यासमोर सांगताना दिसत आहे.
मनसे कधीकाळी नाशिक महानगरपालिकेत सत्तेत होती. परंतु त्यानंतर शहरात पक्ष वाढला नाही. कार्यकर्त्यांना कोणता झेंडा घेऊ मी हाती… असा प्रश्न पडला.