‘उद्धव ठाकरे यांची त्यांच्या सासरवाडीमध्ये सभा, माझी त्यांना विनंती…’, मनसेचे राजू पाटील काय म्हणाले?
"उद्या उद्धव ठाकरे यांची त्यांच्या सासरवाडीमध्ये सभा आहे. माझी त्यांना विनंती आहे. स्पीकर न लावता भोंगे लावा आणि लोकांना सभा ऐकवा", असं म्हणत राजू पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली.
मनसेच्या एकमेव आमदारांना पुन्हा निवडून आणण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची धावपळ बघायला मिलत आहे. राज ठाकरे यांची उद्या दिव्यात जाहीर सभा होणार आहे. मनसे आमदार राजू पाटील यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे दुसऱ्यांदा प्रचाराच्या मैदानात उतरताना दिसत आहेत. तिरंगी लढतीत रंगलेल्या कल्याण ग्रामीण मतदारसंघात ठाकरे गट, शिंदे गट, आणि मनसेचा चुरशीचा सामना आहे. त्यामुळे राज ठाकरे यांची उद्या होणारी सभा लक्षवेधी ठरणार आहे. दरम्यान, राजू पाटील यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
“कल्याण ग्रामीणमध्ये चांगलं वातावरण आहे. कार्यकर्ते, नातेवाईक सगळ्यात जोमाने काम करत आहेत. राज ठाकरे आणि माझ्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये प्रेम आहे म्हणून सगळे जोरात कामाला लागले आहेत. राज ठाकरे यांचा माझ्यावर जीव आहे. मी एकमेव आमदार असून पक्षाचा नेता आहे. इकडच्या लोकांनी आम्हाला निवडून दिलं. राज ठाकरे यांच्या सभेत वेगळा विचार असतो. ते त्यांचे विचारांवर ठाम असतात. त्यांचे मुद्दे असतात. राजकीय परिस्थितीवर त्यांचं मांडलेलं मत सर्वांना आवडतं. विशेष म्हणजे दिव्यात मराठी आणि हिंदू वसाहत आहे. त्या अनुषंगाने त्या ठिकाणी रेकॉर्ड ब्रेक गर्दी देखील होईल”, असं राजू पाटील म्हणाले.
‘उद्धव ठाकरे यांची त्यांच्या सासरवाडीमध्ये सभा’
“जनतेने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनादेखील काही वर्ष एक्सेप्ट केलं नव्हतं. निवडणुकीचे राजकारण आणि विचारांची मूठ बांधून चाललेला आमचा एकमेव पक्ष आहे. उद्या उद्धव ठाकरे यांची त्यांच्या सासरवाडीमध्ये सभा आहे. माझी त्यांना विनंती आहे. स्पीकर न लावता भोंगे लावा आणि लोकांना सभा ऐकवा”, असं म्हणत राजू पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली.
राजू पाटील यांची शिंदे गटावर टीका
“मी लोकसभेत माझे खिसे भरण्यासाठी निधी मागितला नव्हता. राज ठाकरे यांनी देखील पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून मोदींना सुद्धा पाठिंबा दिला होता. इकडचे खासदार हे मुख्यमंत्र्यांचे पुत्र आहेत. माझ्या मतदारसंघात मोठी वस्ती आहे, चार वर्षापासून महापालिकेत प्रशासक असल्याने गटार पाणी, नगरसेवक लेव्हलची कामे होत नाहीत. यासाठी मी खासदारांकडे निधीची मागणी केली. त्यांनी निधी देण्याचं आश्वासन दिलं. मात्र ते त्यांनी पूर्ण केलं नाही. कार्यकर्त्यांची अपेक्षा होती ते विधानसभेत आपल्याला मदत करतील. मात्र मला गॅरंटी होती की ही लोकं मला मदत करणार नाहीत”, अशी टीका राजू पाटील यांनी केली.