फडणवीस- उद्धव ठाकरे यांची भेट योगायोग नव्हता, ते घडवून आणलं होतं, संदीप देशपांडे यांचं लॉजिक, राजकीय चर्चांना उधाण
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट हा निव्वळ योगायोग नव्हता तर तो घडवून आणलेला योग होता, मनसे नेते संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया नेमकी काय?
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) नवी समीकरणं मांडणारी एक घटना काल विधानभवनात घडली. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची भेट झाली. अर्थात विधानभवनाच्या पायऱ्यांवर झालेली ही भेट काही मिनिटांचीच होती. पण यामागे नक्की काहीतरी राजकीय संकेत आहेत, अशी चर्चा रंगली आहे. राजकारणात कधीही काहीही घडू शकतं, त्यामुळे ही भेट निव्वळ योगायोग समजू नका, असे जाणकार बोलू लागलेत. मनसे नेते संदीप देशपांडे यांनीदेखील कालची विधानभवनातील भेट हा योगायोग नव्हता. तर तो घडवून आणलेला योग होता, असं वक्तव्य केलंय. या भेटीमागे नेमकं काय लॉजिक आहे, तेसुद्धा त्यांनी सांगितलंय.
भेटीचं कारण काय?
संदीप देशपांडे यांनी फडवणीस आणि ठाकरे यांच्या भेटीमागे उद्धव ठाकरे यांच्या मनातील भीती असल्याचं म्हटलंय. दोन हिंदुत्त्ववादी पक्ष एकत्र येऊ नयेत, यासाठी त्यांचे नेहमी प्रयत्न असतात. त्याच भीतीतून कालची भेट घेतल्याचं संदीप देशपांडे यांनी म्हटलंय. देशपांडे म्हणाले, मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी गुढी पाडव्याच्या भाषणात सांगितलं. भाजप आणि मनसे एकत्र येऊ नयेत म्हणून २०१४, २०१७ मध्ये उद्धव ठाकरे यांनी चाली खेळल्या. हे दोन हिंदुत्ववादी पक्ष एकत्र येऊ नयेत म्हणून प्रयत्न केले. तीच भीती ठाकरेंना आहे. भाजप-मनसे युती होईल की नाही माहिती नाही. पण भीत्यापाठी ब्रह्मराक्षस या म्हणीप्रमाणे तुम्हाला हे सातत्याने सतावतेय. म्हणून काल जो विधानसभेत घडला, तो योगायोग नव्हता. म्हणून तुम्ही विधानभवनाच्या दारात गप्पा मारत थांबलात. हे न कळण्याइतकं आम्ही मूर्ख नाहीत. गल्लीतल्या शेमड्या पोरालाही कळेल…. असं वक्तव्य देशपांडे यांनी केलंय.
खंजीर खुपसण्याची उद्धव ठाकरेंना सवय
संदीप देशपांडे उद्धव ठाकरेंना उद्देशून म्हणाले, ‘ षडयंत्र करायची तुमची सवय आहे. आधी राज ठाकरे, नारायण राणे यांच्याविरोधात षडयंत्र केलं. त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. हा तुमचा स्थायी भाव आहे. २०१९ साली तुम्ही मतदार आणि भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला. जे प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केले, त्यांना उत्तरं नव्हती. मग सुमार, पांचट विनोद करून प्रतिक्रिया द्यायची. वेळ मारून न्यायची, अशा शब्दात संदीप देशपांडे यांनी टीका केली.
तेव्हाच का नाही उखडलं?
माहिम येथील बांधकाम जुनच होतं, यावरून ठाकरे गटाकडून टीका होतेय. संदीप देशपांडे यांनी यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘तुम्ही म्हणताय २००७ साली बांधकाम होतं तर तुमचे आमदार, खासदार, नगरसेवक, महापौर काय करत होते? तुम्ही नारायण राणे, कंगना रानावतच्या घरी महानगरपालिका पाठवली. मग तुम्ही का नाही ते अनधिकृत बांधकाम उखडलं? तुम्ही तासन् तास महापौर बंगल्यात बसून असायचे. तुमचा डोळा फक्त बंगल्यावर होता. समोर होणाऱ्या अतिक्रमणावर नव्हता. त्यामुळे तुमचं लक्ष गेलं नाही…