पुणे : माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या पत्नीला दिलासा मिळाला आहे. मुंबईतील विशेष न्यायालयाने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात (Money Laundering) त्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने १ लाखाच्या जातमुचलक्यावर त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. जामीन मंजूर करताना विनपरवानगी देश सोडून जाता येणार नसल्याची अट ठेवली आहे. चौकशीसाठी जेव्हा बोलवणार त्यावेळी हजर राहण्याचे न्यायालयाने सांगितले आहे.
पुणे येथील भोसरी भूखंड घोटाळ्या प्रकरणात एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांचे नाव पुढे आले होते. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात त्यांच्याविरोधातही सेशन्स कोर्टाने अटक वॉरंट जारी केले होते. त्यामुळे मंदाकिनी खडसे यांना अटक होणार अशी शक्यता निर्माण झाली होती. या निर्णयाविरोधात मंदाकिनी खडसे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आपण चौकशीला सहकार्य करणार आणि चौकशीसाठी हजर राहणार असल्याचे त्यांनी न्यायालयात सांगितले होते. यावर कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला. दरम्यान, एकनाथ खडसे यांनाही दिलासा देत कोर्टाने त्यांना देखील जमीन मंजूर केला होता.
काय आहे प्रकरण
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारमध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री होते. त्यावेळी पुण्यातील भोसरी येथे ३.१ एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी केली. ही खरेदी करताना आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांचावर होता. ही जमीन फक्त ३.१ कोटी रुपये किंमतीत घेतली. तिची किंमत ६० कोटी असल्याचा अंदाज होता. रेडीरेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी केल्याचा आरोप आहे. याप्रकरणाच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीश झोटींग समितीची नियुक्ती केली गेली होती.
जावई चौधरींवर ठपका
एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्यावर या जमीन व्यवहार प्रकरणात ठपका ठेवण्यात आला होता. गिरीश चौधरी यांची ५.७३ कोटीची संपत्ती जप्त केली आहे. ईडीने खडसे यांचा जळगाव व लोणावळा येथील बंगलाही जप्त केला आहे.