छत्री-रेनकोट काढून ठेवा, उष्णतेची लाट संपणार आणि पुढील पाच दिवस धो-धो बरसणार
पावसाळा सुरु झाला असून येत्या पाच दिवसात महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मान्सूनने महाराष्ट्रातील बराच परिसर व्यापला असून आता पावसाला जोरदार सुरुवात झालीये. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे.
अनेक भागात सध्या अजूनही उष्णतेचा सामना करावा लागत आहे. पण आता काळजी करू नका, कारण तुम्हाला यापासून लवकरच दिलासा मिळणार आहे. पावसाची वाट पाहणाऱ्यांची प्रतिक्षा आता संपणार आहे. त्यामुळे आता तुम्ही छत्री आणि रेन कोट खरेदी करु शकता किंवा जुने असल्यास ते वापरण्यासाठी बाहेर काढू शकता. उत्तर प्रदेश आणि दिल्ली वगळता बाकी संपूर्ण देशात उष्णतेची लाट संपणार नाही. पुढच्या चार ते पाच दिवसात मुसळधार पावसाचा इशारा देखील देण्यात आला आहे.
शुक्रवारी बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेश वगळता जवळजवळ संपूर्ण देशात उष्णतेची लाट कमी झाल्याचं दिसत आहे. त्यामुळे आता हवमान थंड राहणार असून पाऊस देखील सुरु होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत तुम्ही मान्सूनच्या पावसाची मज्जा घेऊ शकतात.
संपूर्ण भारतातील उष्णतेची लाट लवकरच संपणार असून पावसाला सुरुवात होणार आहे. 17 जून रोजी हवामानात बरेच बदल होणार आहेत. हवामान खात्याने असेही म्हटले आहे की 1 ते 12 जून या कालावधीत दक्षिण भारतात सामान्यपेक्षा 60 टक्के जास्त पाऊस झाला आहे.
महाराष्ट्रात देखील मोसमी पावसाचे आगमन झाल्याने तापमानात प्रचंड घट पाहायला मिळत आहे. राज्यातील बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे. हवामान खात्यानं विदर्भासाठी पुढील 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
अनेक जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. अहमदनगर, पुणे, सोलापूर मराठवाडा, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये वीजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अकोला, बुलढाणा, वाशिम तसेच यवतमाळमध्ये पुढील पाच दिवस वादळी पावसाची शक्यता आहे.
मान्सून आता चंद्रपूरपर्यंत पोहोचला असून मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र देखील व्यापला आहे. मुंबईत देखील पावसाचं आगमन झालं आहे. मुंबईसह ठाण्यात हलक्या स्वरुपाचा पाऊस होतोय. पुण्यात मागील आठवड्यात मुसळधार पाऊस झाला आहे.