अखेर तीन वर्षांनंतर शिक्षकांच्या बदल्या, वाचा कोणत्या धोरणानुसार बदल्या
नव्या धोरणानुसार एकाच शाळेवर किमान पाच वर्षे कार्यरत असलेल्या शिक्षकांना बदली प्रक्रियेत सामावेश केला आहे. एकूण बदल्यांमध्ये संवर्ग एकमधील ६ हजार ६९० आणि संवर्ग दोनमधील ३ हजार ४०० शिक्षकांचा समावेश केला आहे.
पुणे : teacher transfer कोरोनाचे दोन वर्षे आणि मागील वर्षी बदल्यांसाठीचे नवीन आलेले ऑनलाईन सॉफ्टरवेअर यामुळे शिक्षकांच्या बदल्या रखडल्या होत्या. तीन वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या शाळांमधील प्राथमिक शिक्षकांच्या रखडलेल्या बदल्यांना अखेर मुहूर्त मिळाला आहे. नवीन बदली धोरणानुसार राज्यातील संवर्ग एक आणि संवर्ग दोनमधील मिळून बदल्या करण्यात आल्या आहे. राज्यातील एकूण १० हजार ९० शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या झाल्या आहेत. नवीन सॉफ्टवेअर प्रणालीनुसार झालेली ही पहिलीच बदली प्रक्रिया आहे. या बदल्या प्रक्रियेमुळे तीन वर्षानंतर का असेना शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.
का रखडल्या होत्या बदल्या :
शिक्षकांच्या बदल्यांचे जुने धोरण रद्द करण्यात आले होते.तत्कालीन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी शिक्षकांच्या बदल्यांचे नवे धोरण २७ फेब्रुवारी २०१७ ला आणले होते. त्यानंतरचे दोन वर्षे कोरोना महामारीमुळे जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया राबवता आली नव्हती. अखेरी २०२३ मध्ये शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. तीन वर्षाच्या खंडानंतर यंदा पहिल्यांदाच शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या झाल्या आहेत.
काय आहे नियम :
नव्या धोरणानुसार एकाच शाळेवर किमान पाच वर्षे कार्यरत असलेल्या शिक्षकांना बदली प्रक्रियेत सामावेश केला आहे. एकूण बदल्यांमध्ये संवर्ग एकमधील ६ हजार ६९० आणि संवर्ग दोनमधील ३ हजार ४०० शिक्षकांचा समावेश केला आहे.
प्रणाली विकसित केल्याने बदल्या :
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी विकसित करण्यात आलेल्या प्रणालीमुळे बदल्यांच्या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता येणार आहे. या बदल्यांसाठी ठरवण्यात आलेल्या निकषांनुसारच ही प्रक्रिया पूर्ण केली गेली आहे. ग्रामीण भागातील सरंजामदारांकडून राजकीय हेतूंनी प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेचा गैरवापर होत असे. या सरंजामदारांना या बदली प्रक्रियेमुळे चाप बसला आहे, असेही भांडारी यांनी नमूद केले आहे.