अखेर खुलासा, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून प्रतिज्ञापत्र सादर करणारे ‘ते’ आमदार आणि खासदार कोण?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निकालानंतर आता एक मोठा खुलासा झाला आहे. राष्ट्रवादीच्या 5 आमदार आणि एका खासदाराने दोन्ही गटांच्या बाजूने प्रतिज्ञापत्र सादर केले आहेत. हे प्रतिज्ञापत्र नेमकी कोणी सादर केले होते याबाबतची माहिती आता समोर आली आहे.
अक्षय मंकणी, Tv9 प्रतिनिधी | 8 फेब्रुवारी 2024 : केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हाच्या प्रकरणावर निकाल दिलाय. निवडणूक आयोगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हं बहाल केलं आहे. निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधींच्या संख्याबळाच्या आधारावर निकाल दिल्याचं स्पष्ट झालं आहे. निवडणूक आयोगाच्या निकालात एक महत्त्वाची बाब स्पष्ट झाली आहे. राष्ट्रवादीच्या 5 आमदार आणि एका खासदाराने दोन्ही गटांच्या बाजूने प्रतिज्ञापत्र दिल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे हे लोकप्रतिनिधी कोण आहेत? असा प्रश्न उपस्थित केला जातो. याबाबत अखेर महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून प्रतिज्ञापत्र सादर करणाऱ्या लोकप्रतिनिधींचे नावे अखेर समोर आली आहेत.
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून ज्या पाच आमदार आणि एका खासदाराने प्रतिज्ञापत्र सादर केले होते त्यामध्ये शरद पवार यांच्या गटाची बाजू खमकेपणाने मांडणारे नेते अमोल कोल्हे यांचा समावेश आहे. अमोल कोल्हे हे शरद पवार गटाचे खासदार आहेत. अजित पवार यांच्यासह त्यांच्या गटाच्या 9 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हा अमोल कोल्हे हे तिथे उपस्थित होते. पण नंतर कोल्हे यांनी आपण अजित पवार गटासोबत नसून शरद पवारांच्या सोबत असल्याचं म्हटलं होतं. आतादेखील अमोल कोल्हे यांचं नाव समोर आल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
‘या’ आमदारांनी दोन्ही बाजूने प्रतिज्ञापत्रे दिली
मिळालेल्या माहितीनुसार, आमदार चेतन तुपे, किरण लहामते, राजेंद्र शिंगणे, मानसिंग नाईक, अशोक पवार या पाच आमदारांनी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या बाजूने प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं. तसेच खासदार अमोल कोल्हे यांनीदेखील प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं. याबाबतची नावे समोर आल्यानंतर आणि चर्चांना उधाण आल्यानंतर अमोल कोल्हे यांनी आपली भूमिका मांडली आहे.
अमोल कोल्हे यांची भूमिका काय?
खासदार अमोल कोल्हे यांनी दोन्ही गटाच्या बाजूने प्रतिज्ञापत्र दिल्याचं स्पष्ट झालं आहे. पण त्यावर कोल्हे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. अजित पवार गटाने दिशाभूल करुन प्रतिज्ञापत्र घेतलं, असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत. अमोल कोल्हे यांच्यासह आमदार अशोक पवार यांनीदेखील असाच आरोप केला आहे. काउंटर प्रतिज्ञापत्रात आमच्याकडून दिशाभूल करुन अजित पवार गटाने प्रतिज्ञापत्र घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे.