अजित पवारांच्या घोषणेनंतर ‘एमपीएससी’ भरतीप्रक्रियेला वेग; 4 सप्टेंबरला दुय्यम सेवा पूर्वपरीक्षा
‘एमपीएससी’च्या सदस्यांची नियुक्ती 31 जुलैपर्यंत करण्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या विधीमंडळातील घोषणेनुसार त्यासंबंधीचा जुलैच्या शेवटच्या आठवड्यातंच पाठवण्यात आला आहे. राज्यपाल महोदयांकडून त्यावरील कार्यवाही लवकरच होण्याची अपेक्षा असल्याचं मत सरकारमधील नेते व्यक्त करत आहेत.
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘एमपीएससी’च्या माध्यमातून राज्यात साडेपंधरा हजार पदे भरण्याची घोषणा विधीमंडळात केल्यानंतर ‘एमपीएससी’च्या भरतीप्रक्रियेने वेग घेतला आहे. ‘दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्वपरीक्षा 2020’ येत्या 4 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आली आहे. परीक्षा जाहीर झाल्याने राज्यातील तरुणांना शासकीय सेवेत दाखल होण्याची संधी यानिमित्ताने उपलब्ध होणार आहे. ‘एमपीएससी’च्या सदस्यांची नियुक्ती 31 जुलैपर्यंत करण्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या विधीमंडळातील घोषणेनुसार त्यासंबंधीचा जुलैच्या शेवटच्या आठवड्यातंच पाठवण्यात आला आहे. राज्यपाल महोदयांकडून त्यावरील कार्यवाही लवकरच होण्याची अपेक्षा असल्याचं मत सरकारमधील नेते व्यक्त करत आहेत. (MPSC recruitment process accelerated after Deputy CM Ajit Pawar’s announcement)
‘दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्वपरीक्षा 2020’ पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार 11 एप्रिल 2021 रोजी होणार होती. कोरोनासंकटामुळे ती पुढे ढकलावी लागली होती. ती परीक्षा आता 4 सप्टेंबर रोजी होणार आहे. ‘एमपीएससी’च्या इतरही पदांच्या भरतीलाही राज्यशासनाने मान्यता दिली आहे. त्यासंबंधीचा शासननिर्णय 30 जुलै रोजीच जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार राज्य शासनाच्या विविध विभागांतील रिक्त पदांपैकी उपसमितीने परवानगी दिलेल्या रिक्त पदांसह, उच्चस्तरीय सचिव समितीने मंजूर केलेली आकृतिबंधातील पदे भरण्यासाठी विशेष बाब म्हणून भरण्यात येणार आहेत.
प्रस्ताव 30 सप्टेंबरपर्यंत ‘एमपीएससी’कडे पाठविण्याचे निर्देश
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यासंदर्भातील आदेश दिले होते. रिक्त पदे भरण्यासाठी संबंधित विभागांनी बिंदु नामावली तयार करुन, मान्यता घेऊन प्रस्ताव 30 सप्टेंबरपर्यंत ‘एमपीएससी’कडे पाठविण्याचे शासननिर्णयात स्पष्ट केलं आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 28 जुलैला झालेल्या बैठकीनंतर दोनच दिवसात 30 जुलै रोजी वित्त विभागाचा तो शासननिर्णय जारी झाला होता. गेल्या काही आठवड्यात ‘एमपीएसससी’च्या स्तरावर होत असलेल्या कार्यवाहीचा वेग लक्षात घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 15 हजार 500 हून अधिक पदांची भरती करण्याची विधीमंडळात केलेली घोषणा युद्धस्तरावर कार्यान्वित करण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत.
संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख जाहीर
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा आयोजित करण्यास आपत्ती व्यवस्थापन विभागानं परवानगी दिली आहे.आपत्ती व्यवस्थापन विभागानं परीक्षा घेण्यास परवानगी दिल्यानं परीक्षेचा मार्ग मोकळा झाला आहे. 4 सप्टेंबरला संयुक्त गट ब पूर्व परीक्षा आयोजित केली जाणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं या संदर्भात परिपत्रक जारी केलं आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळं 11 एप्रिल रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. विद्यार्थ्यांकडून देखील सातत्यानं परीक्षा कधी आयोजित केली जाणार यांसदर्भात विचारणा केली जात होती.
कोरोनामुळे परीक्षा लांबणीवर
मार्च महिन्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्य सेवा परीक्षेनंतर अनेक विद्यार्थ्यांना कोरोना विषाणू संसर्ग झाला होता. त्यामुळे पुणे, मुंबईसह राज्यात आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा लांबणीवर टाकण्याची मागणी केली होती. विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 4 August 2021https://t.co/z9osnR5IAk | #TOP9News | #MPSC | #mumabi | #pune | #Maharashtra |
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 4, 2021
संबंधित बातम्या :
ठाकरे सरकारचं पॅकेज 11 हजार 500 कोटींचं, पण प्रत्यक्ष तातडीची मदत 1500 कोटींचीच, फडणवीसांचा दावा
MPSC सदस्य नियुक्तीची फाईल मंजूर करा,ठाकरे सरकारचा मंत्री राज्यपालांना भेटून विनंती करणार
MPSC recruitment process accelerated after Deputy CM Ajit Pawar’s announcement