शिवनेरीला झाला मोकळा समुद्र….एसटीला मिळाला शॉर्टकट, अटल सागरी सेतूवरुन पु्ण्याला चला
देशातील सर्वात मोठा सागरी सेतू असलेल्या शिवडी ते न्हावा शेवा या सागरी मार्गावरुन आता एसटीच्या शिवनेरी बसेस धावणार आहेत. त्यामुळे मुंबई ते पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा फायदा होणार आहे. त्यांच्या प्रवासाच्या वेळेत घसघशीत बचत होणार आहे.
निवृत्ती बाबर, टीव्ही 9 मराठी, प्रतिनिधी, मुंबई | 19 फेब्रुवारी 2024 : नवीमुंबईच्या परिवहन सेवेनंतर आता एसटीच्या शिवनेरीला देखील नुकत्याच सुरु झालेल्या देशातील सर्वात मोठ्या सागरी मार्गावरुन प्रवास करण्याची मुभा मिळाली आहे. त्यामुळे मुंबई ते पुणे धावणारी शिवनेरी आता समुद्राची हवा खात पुण्याला रवाना होणार आहे. या प्रवासाची सुरुवात उद्या दि.20 फेब्रुवारीपासूनच होणार आहे. या नव्या मार्गामुळे शिवनेरीच्या काही फेऱ्या अटल सागरी सेतूवरुन मुंबईत पोहचतील त्यामुळे प्रवासाचा सुमारे एक तास वाचणार आहे.
देशातील सर्वात मोठ्या शिवडी ते न्हावा शेवा या सागरी मार्गाचे नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या मार्गावरुन वाहतूक सुरु देखील झाली. हा मार्ग येत्या एक- दोन वर्षात वरळी कनेक्टरद्वारे वरळी-वांद्रे सागरी सेतूला जोडण्यात येणार आहे. हा मार्ग पुढे मुंबई ते पुणे द्रुतगत महामार्गाला जोडण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गाने आता एसटी महामंडळाच्या मुंबई ते पुणे शिवनेरी या प्रतिष्ठीत सेवेची सुरुवात होणार आहे. एसटी शिवनेरीच्या मोजक्या फेऱ्या अटल सागरी सेतूवरून चालविण्यासाठी परवानगी मिळाली आहे.
प्रवासाच्या वेळेत एक तासांची बचत
शिवडी ते नाव्हाशेवा दरम्यान सुरु करण्यात आलेल्या नव्या अटल सेतू सागरी सेतूनवरून एसटीची शिवनेरी बस प्रायोगिक तत्वावर उद्यापासून धावणार आहे. दिनांक 20 फेब्रुवारीपासून पुणे स्टेशन – मंत्रालय ( स. 6.30 वा. ) आणि स्वारगेट – दादर ( स. 7.00 वा. ) या दोन मार्गावर शिवनेरी बस सुरू करण्यात येणार आहेत. या शिवनेरी बसेस पुण्यातून थेट पनवेल, नाव्हाशेवा, शिवडी मार्गे मंत्रालय/दादर येथे पोहोचणार आहे. परत स. 11 वा. आणि दुपारी 1 वाजता याचमार्गे अनुक्रमे मंत्रालय आणि दादर येथून सुटतील. या नव्या मार्गामुळे गर्दीच्या वेळी प्रवासाचा सुमारे एक तास वाचणार आहे. प्रवाशांसाठी आनंदाची बाब म्हणजे तिकटदरामध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे प्रवाशांनी या बस फेऱ्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे. या बस फेऱ्यांचे आरक्षण एसटीच्या अधिकृत msrtc mobile reservation ॲप वर आणि www.msrtc.gov.in संकेतस्थळावर करता येणार आहे.
अटल सेतू मार्गे तिकीट दर
स्वारगेट – दादर : रुपये 535 /-
पुणे स्टेशन – दादर : रुपये 515 /-
पुणेस्टेशन – मंत्रालय : रुपये 555 /-