एसटीच्या अत्याधुनिक इलेक्ट्रीक शिवनेरीचे लोकार्पण, या मार्गावर सुरूवात होणार, इतक्या बसेस दाखल होणार
राज्य सरकारने एसटीचा संपूर्ण चेहरामोहराच बदलण्याचा संकल्प सोडला आहे. ठाणे-पुणे मार्गावर एसटीच्या नव्या इलेक्ट्रीक शिवनेरी बसेसच्या उद्घाटनासह अनेक योजनांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
मुंबई : एसटी महामंडळाचा ( Msrtc ) मुंबई ते पुणे मार्गावरील प्रतिष्ठीत ब्रॅंड ‘शिवनेरी’ आता हायटेक होणार आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई – ठाणे – पुणे मार्गावर एसटीच्या शंभर नवीन अत्याधुनिक इलेक्ट्रीक शिवनेरी ( Electric Shivneri ) बसेस टप्प्या टप्प्याने दाखल होणार आहेत. एसटीच्या ताफ्यात आठ नव्या इलेक्ट्रीक शिवनेरी दाखल झाल्या असून पहिल्या ठाणे – पुणे इलेक्ट्रीक शिवनेरी बसचे उद्घाटन सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सह्याद्री गेस्ट हाऊस येथे करण्यात आले.
राज्य सरकारने एसटीचा संपूर्ण चेहरामोहराच बदलण्याचा संकल्प सोडला आहे. ठाणे-पुणे मार्गावर एसटीच्या नव्या इलेक्ट्रीक शिवनेरी बसेसच्या उद्घाटनासह अनेक योजनांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी हिंदूह्र्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. प्रसिद्ध मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे यांना एसटीचे सदिच्छा दूत म्हणून जाहीर करण्यात आले.
ठाणे ते पुणे शिवनेरीचे भाडे
ठाणे ते पुणे मार्गावर आठ शिवनेरीच्या माध्यमातून सध्या सेवा पुरविण्यात येणार आहे, 20 वर्षांपूर्वी मुंबई ते पुणे मार्गावर साल 2002 मध्ये दाखल शिवनेरी सेवा सुरु झाली, नंतर एसटीचा हा शिवनेरी ब्रॅंड प्रतिष्ठीत बनला. नंतर शंभर डीझेल शिवनेरींना इलेक्ट्रीकमध्ये शिवनेरीत रूपांतरीत करण्याची योजना असून ठाणे ते पुणे प्रवासाचे भाडे 515 रूपये तर महीला आणि 65-75 वयोगटातील ज्येष्ठांना अर्धे तिकीट 275 रूपये असणार आहे. तर 75 वयाच्या पुढील अमृतमहोत्सवी ज्येष्ठांना संपूर्ण मोफत प्रवास आहे.
स्वच्छतादूत मकरंद अनासपुरे
एसटीच्या बसेस, स्वच्छतागृहे आगार, बसस्थानकआणि परिसर स्वच्छ राखण्यास प्रोत्साहन मिळण्यासाठी स्पर्धात्मक स्वरुपात अभियान राबवून उत्कृष्ट बसस्थानकांना रोख बक्षीस देवून गौरविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. एसटीचे स्वच्छता दूत म्हणून अभिनेते मकरंद अनासपुरे यांची यावेळी निवड करण्यात आली. एसटी जशी ग्रामीण भागाचं प्रतिनिधीत्व करते त्याचप्रमाणे नवीन सदिच्छा दूत मकरंद अनासपुरे यांची ओळख देखील ग्रामीण भागापर्यंत आहे, त्यांचं सामाजिक काम देखील मोठ्या प्रमाणावर आहे, त्याचा फायदा एसटीला होईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.
इलेक्ट्रिक बस सेवेमुळे प्रदूषणही कमी
राज्यातल्या 97 टक्के लोकांपर्यंत एसटी पोहचली आहे. पर्यावरण, प्रदूषण याचा विचार करून एसटी महामंडळाने इलेक्ट्रिक बस सेवा सुरु केली असून त्या कौतुकही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले. नव्या इलेक्ट्रीक बसेसमुळे हवा आणि ध्वनीचे प्रदूषण टळणार असून डीझेलचा खर्चही वाचणार आहे. राज्यातील 75 वर्ष पुर्ण झालेल्या 8 कोटीपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांनी एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवासाचा लाभ घेतला याचे समाधान आहे. महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये तिकीट दरात 50 टक्के सवलत दिली आहे. दररोज 17 ते 20 लाख महिला प्रवासी याचा लाभ घेत आहेत, यामुळे एसटीकडे मोठ्या प्रमाणात प्रवाशी वळताहेत याविषयी मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.