आम्हाला ओबीसीतून बाहेर ढकलण्याचा डाव; छगन भुजबळ यांचा गंभीर आरोप
Chhagan Bhujbal on Maratha Reservation OBC Reservation : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शिंदे सरकारवर घणाघात केलाय. मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याला छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. याच मुद्द्यावरून छगन भुजबळ यांनी सरकार गंभीर आरोप केलेत.
मुंबई | 08 नोव्हेंबर 2023 : मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलेला असतानाच आता ओबीसी आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात आक्रमक भूमिका घेतली आहे. आम्हाला ओबीसीतून बाहेर ढकलण्याचा डाव असल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केला आहे. बाळासाहेब सराटे यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होत आहे. या सुनावणीसाठी छगन भुजबळ हे मुंबई उच्च न्यायलयात दाखल झाले आहेत. यावेळी भुजबळांनी माध्यमांशी संवाद साधला. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मुद्द्यावरून छगन भुजबळ यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
ज्यांना कायदेशीरदृष्ट्या आरक्षण देता येत नाही. त्या लोकांना ओबीसीमध्ये घेतलं जात आहे आणि जे आधीपासूनच ओबीसीमध्ये आहेत. त्यांना मात्र ओबीसीतून बाहेर ढकलायचा डाव सुरु आहे. असा दुहेरी कार्यक्रम सुरु आहे, असं म्हणत मंत्री छगन भुजबळ यांनी टीका केली आहे.
“…तर कुणालाच काही मिळणार नाही”
मराठा समाजाला सर्व प्रकारचं आरक्षण हवं आहे. एकाला कुणबी प्रमाणपत्र मिळालं की त्याच्या नातेवाईकांनाही कुणबी प्रमाणपत्र मिळणार. प्रमाणपत्र मिळालं की, त्यांना आरक्षण मिळणार. शैक्षणिक, नोकरी आणि राजकारणात त्यांना आरक्षण मिळणार आहे. यात आमचं म्हणणं आहे की, ओबीसीमध्ये आधीच 375 जाती असताना आता हे लोक आहेत. अशात मराठा समाजही यात आला, तर कुणालाच काही मिळणार नाही, असं छगन भुजबळ म्हणालेत.
बच्चु कडू यांचा भुजबळांना विरोध
आमदार बच्चू कडू यांनी छगन भुजबळ यांच्या भूमिकेला विरोध केला आहे. मराठा कुणबी नाहीतर कोण? पाकिस्तानातून आणि अमेरिकेतून मराठा समाज आलाय का? मराठा हे कुणबीच आहेत. काही लोक मतांचा हिशोब करून आपली राजकीय पोळी भाजत आहेत. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं. छगन भुजबळ अभ्यासू नेते आहेत. महात्मा फुले यांनी सांगितलं आहे की, कुणबी, माळी, मराठा हे भाऊ भाऊ आहेत. त्यांना वेगळे करू नका. अठरा पगड जातीतले सगळे मराठे आहेत. मराठे हे समुहवाचक शब्द आहेत ते कोण्या जातीचा नाही. मराठे कुणबीच आहेत, असं बच्चू कडू म्हणालेत.