काँग्रेसवर नाराजीनंतर वर्षा गायकवाड आल्या समोर… विश्वासात घेतले नसल्याचे सांगत…
varsha gaikwad: मुंबईत काँग्रेस सोडून आमचे काही नेते गेले असले तरी पक्ष अजून मजबूत आहे. मुंबईत पक्षाचे वेगळे अस्तित्व आहे. तसेच पक्ष संघटनेत काम करताना कार्यकर्त्यांच्या अपेक्षा असतात. महाविकास आघाडीसोबत जागा वाटपावर चर्चा करताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने कठोर भूमिका घ्यायला हवी होती.
महाराष्ट्र काँग्रेसमध्ये गेल्या काही महिन्यांपासून एकामागे एक भूकंप घडत आहेत. काही बडे नेते पक्ष सोडून गेले आहेत. लोकसभा निवडणुकीचा पहिल्या टप्प्यातील मतदान आठ दिवसांवर आले आहे. त्यानंतर सांगली आणि मुंबईतील जागा वाटपावरुन काँग्रेसमधील नाराजी दूर झालेले नाही. महाविकास आघाडीमध्ये असलेल्या धुसफुसीचा परिणाम काँग्रेस पक्षावर झाला आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्यासंदर्भात बुधवारी मोठी बातमी आली होती. त्या कुणाचेच फोन घेत नव्हत्या. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत त्यांच्या भेटीसाठी त्यांच्या घरी गेले होते. उद्धव ठाकरे यांची त्यांनी भेट घेतली होती, अशा चर्चा बुधवारी रंगल्या होत्या. त्यावर अखेर वर्षा गायकवाड यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले आहे. यावेळी त्यांनी पक्षाने आपणास विश्वासात घेतले नाही, असेही स्पष्टपणे सांगितले.
काय म्हणाल्या वर्षा गायकवाड
वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, मुंबईत जागा वाटपावर आम्ही नाराज आहोत. यामुळे पक्षश्रेष्ठींकडे माझे म्हणणे मी मांडले आहे. मुंबईत अनेक ठिकाणी आमचे संघटन आहे. यामुळे मुंबईत पक्षाला प्रतिनिधीत्व मिळावे, ही अपेक्षा होती. मुंबईतील कोणत्या जागा हव्या होत्या, ते पक्षातील श्रेष्ठींना सांगितले होते. जो उमेदवार जिंकणार आहे, त्याला तिकीट द्यावे, ही अपेक्षा होती.
विश्वासात घेतले नाही
मुंबईत काँग्रेस सोडून आमचे काही नेते गेले असले तरी पक्ष अजून मजबूत आहे. मुंबईत पक्षाचे वेगळे अस्तित्व आहे. तसेच पक्ष संघटनेत काम करताना कार्यकर्त्यांच्या अपेक्षा असतात. महाविकास आघाडीसोबत जागा वाटपावर चर्चा करताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने कठोर भूमिका घ्यायला हवी होती. या जागा वाटपाच्या वेळी मलाही विश्वासात घेतले गेले नाही. परंतु मी पक्षाशी एकनिष्ठ आहे. पक्षाचे प्रोटोकॉल पाळणार आहे. आघाडी असताना काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात, काही तडजोडी कराव्या लागतात, असे वर्षा गायकवाड यांनी मान्य केले.
त्या बातम्या निराधार
माझ्यासंदर्भात अनेक बातम्या आल्या आहेत. सचिन सांवत मला भेटण्यासाठील. उद्धव ठाकरे यांना मी भेटले. परंतु असे काहीच झालेले नाही. मी नाराज नाही. मी पक्षाशी एकनिष्ठ आहे. मुंबईत आम्हाला कमीत कमी दोन किंवा तीन जागा मिळायला हव्या होत्या, ही अपेक्षा होती. अनेक ठिकाणी आमचे संघटन असताना डावलण्यात आले आहे. तरी कार्यकर्ता म्हणून आपण काम करत राहणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.