मुंबई : हिंदुत्वाचा पुरस्कार करत असाल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) उद्या मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचावी, असं आव्हान आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी मुख्यमंत्र्यांना दिलंय. रवी राणा यांच्या या आव्हानाला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी सडेतोड उत्तर दिलं. तुम्ही आमदार आहात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काय करावं, काय करू नये हे सांगू नका. यांना जनतेच्या मुख्य प्रश्नांना बगल देत फक्त धार्मिक तेढ निर्माण करायची आहे. हनुमान चालीसा तर आम्ही वाचतोच, पण तुमच्यासारखे ढोल बडवत नाहीत, असं चोख प्रत्युत्तर किशोरी पेडणेकर यांनी दिलं. एवढंच नाही तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपर्यंत न जाता आमच्यासारख्या शिवसैनिकांशी आधी लढून दाखवा, असं आव्हान रवी राणा यांना पेडणेकर यांनी दिलं.
मुख्यमंत्र्यांनी मातोश्रीसमोर हनुमान चालीसाचं पठण करावं, असं आव्हान देणाऱ्या रवी राणा यांना किशोरी पेडणेकर यांनी टीव्ही 9 वर ऑन एअर तत्काळ उत्तर दिलं. त्या म्हणाल्या, ‘ या असल्या आव्हानांना आम्ही विचारत नाहीत. मुळात उद्धवजींनी काय वाचावं, हे सांगणारे हे कोण? हे आमदार आहेत. धार्मिक तेढ निर्माण करण्याचे हे प्रयत्न आहेत. आम्ही दरवर्षीच हनुमान जयंती साजरी करतो, पण तुमच्यासारखे ढोल बडवत नाहीत, अशा शब्दात किशोरी पेडणेकरांनी सुनावले.
किशोरी पेडणेकरांनी आमदार रवी राणांना प्रत्युत्तर देताना म्हटले ,’ झेड सिक्युरिटी मिळाल्यापासून जास्तच आवाज करायला लागले आहेत. तुम्ही कोण ठरवणारे ? तुमच्या घरात, तुमच्या मंदिरात करा ना.. आम्ही तर दरवर्षी वाचतो. तुम्ही केव्हाही या. धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी नाही तर शहाणपणाने शिका. ज्या पद्धतीने लगेच तुम्हाला 60-70 लाखांची सिक्युरिटी मिळाली आहे. त्यानंतर तर तुम्ही जास्तच बोलायला लागले, या शब्दात किशोरी पेडणेकर यांनी रवी राणांना सुनावले.
किशोरी पेडणकर यांनी रवी राणांना प्रत्युत्तरात एक आव्हान दिलं. त्या म्हणाल्या, तुम्ही उद्या दादरमध्ये येऊनच दाखवा. प्रबोधनकार ठाकरे यांनी बांधलेल्या राम मंदिरात उद्या आम्ही महागाईविरोधातलं हनुमान चालीसा वाचणार आहोत, वाटणार आहोत. बेरोजगारी आणि इतर देशातील समस्यांवर आम्ही आंदोलन करणार आहोत, तुम्ही तेथे येऊनच दाखवा, असे त्या म्हणाल्या.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान देत आमदार रवी राणा म्हणाले, ‘ मुख्यमंत्र्यांनी स्वतः मातोश्रीसमोर हनुमान चालीसाचे पठण करावे. यास त्यांचा विरोध असेल तर तर आम्ही स्वतः ते वाचू. हिंदुहृदय सम्राट यांची काय दिशा होती, ती सोडून ते कोणत्या दिशेने चालले आहेत, याची आम्ही त्याची आठवण करू. त्यांना बाळासाहेबांच्या विचारांचे स्मरण करू देऊ, असे रवी राणा म्हणाले.
इतर बातम्या-