पावसाचा धुमाकूळ, मुंबईत दोन ठिकाणी मोठमोठे होर्डिंग्स कोसळले, चित्त विचलित करणारा व्हिडीओ
मुंबईत वादळी वाऱ्यामुळे दोन ठिकाणी होर्डिंग कोसळले आहेत. आधी वडाळ्यात होर्डिंग कोसळल्याची घटना घडली आहे. वडाळ्यात श्री जी टॉवरजवळ होर्डिंग कोसळल्याची घटना घडली. त्यानंतर घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले आहेत.
महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत आज अचानक पाऊस आला. सुरुवातीला ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, डोंबिवली या शहरांमध्ये मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. यानंतर ठाणे शहर, नवी मुंबई, पालघरमध्ये पाऊस येऊन धडकला. पावसासह वारे प्रचंड वेगाने वाहू लागले. ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट बघायला मिळाला. यावेळी धुळीचं प्रचंड मोठं साम्राज्य बघायला मिळालं. वारे वेगाने वाहत असल्याने अनेकांची तारांबळ उडाली. मुंबईत तर दोन ठिकाणी मोठमोठे होर्डिंग कोसळले. या होर्डिंग कोसळल्याच्या घटना कॅमेऱ्यातही कैद झाल्या आहेत. या होर्डिंग कोसळल्याच्या घटना अतिशय चित्तथरारक अशा आहेत.
वडाळ्यात होर्डिंग कोसळलं
मुंबईत वादळी वाऱ्यामुळे दोन ठिकाणी होर्डिंग कोसळले आहेत. आधी वडाळ्यात होर्डिंग कोसळल्याची घटना घडली आहे. वडाळ्यात श्री जी टॉवरजवळ होर्डिंग कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटेनत काही नागरीक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. घटनास्थळी प्रशासनाचं बचाव पथक आणि पोलीस दाखल झाल्याची देखील माहिती मिळत आहे. होर्डिंग कोसळल्याची घटना घडली त्यावेळी सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊसही पडला. याचा परिणाम वाहतुकीवरही झालाय. अनेक ठिकाणी झाडंदेखील उन्मळून पडली आहेत. तसेच वडाळ्यात होर्डिंग कोसळल्याच्या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. संबंधित परिसरात धुळीचं देखील मोठं साम्राज्य बघायला मिळालं.
घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळलं, 100 जण अडकल्याची भीती
वडाळ्यातील होर्डिंग कोसळल्याची घटना ताजी असतानाच घाटकोपरमध्ये भलंमोठं होर्डिंग कोसळल्याची घटना घडली. घाटकोपरमधील रमाबाई परिसरातही मोठं होर्डिंग कोसळलं आहे. पेट्रोल पंपावर हे होर्डिंग कोसळलं आहे. घाटकोपरमध्ये सोसायट्याच्या वाऱ्यासह धुळीचं वादळ आलं. या वादळामुळे भलंमोठं होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळलं. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित पेट्रोल पंपाच्या खाली 100 पेक्षा जास्त नागरीक आणि वाहनं अडकल्याची भीती वर्तवली जात आहे.
घाटकोपरमध्ये होर्डिंग पडल्याची घटना कॅमेऱ्यातही कैद झाली आहे. अतिशय भयानक अशी ही घटना आहे. या घटनेनंतर पोलीस, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आहेत. बचाव पथकाने आतापर्यंत अनेक नागरिकांना बाहेर काढलं आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी पाठवलं आहे. बचावाचं काम अद्यापही सुरु असल्याची माहिती मिळत आहे.
जोगेश्वरीत रिक्षावर झाड कोसळून चालक गंभीर जखमी
दरम्यान, पावसाने जोगेश्वरी पूर्वेकडील मेघवाडी नाक्या जवळील शिवसेना शाखा क्र ७७ जवळील उंच नारळाचे झाड रस्त्यावरील ऑटो रिक्षा वर कोसळले. त्यात हयायत खान हे रिक्षा चालक गंभीर जखमी झाले. शिवसेना शाखेमधील शिवसैनिक केतन कोरगावकर आणि सुधीर चंद्रकांत राणे यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन रिक्षा चालक हायायात खान यांना जोगेश्वरी मधील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल केले. स्थानिक माजी नगरसेवक बाळा नर यांनीही हॉस्पिटल मध्ये जाऊन त्वरित उपचार सुरू करण्यास प्रयत्न केले. रुग्णालय प्रशासनाने उपचार सुरू केले.