आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांच्या भेटीला शरद पवार, निर्णय कधी आणि कसा होईल स्पष्टच सांगितलं, काय म्हणाले पवार?
शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा मागे घ्यावा यासाठी वाय बी चव्हाण सेंटरच्या बाहेर आंदोलन सुरू होते, त्याच पार्श्वभूमीवर त्या आंदोलकांची भेट शरद पवार यांनी घेत मोठं भाष्य केलं आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर संपूर्ण राज्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा अशी मागणी लावून धरली आहे. त्याच पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शरद पवार यांना पत्र लिहिले आहे अनेक आमदारांनी पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी राजीनामा सत्र सुरू केला आहे. शरद पवार जोपर्यंत राजीनाम्याचा निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. शरद पवार आज वाय बी चव्हाण सेंटर येथे बैठकीसाठी आले होते त्याच दरम्यान त्यांना राज्यातील अनेक आमदार पदाधिकारी येऊन भेटत होते याच वेळेला वाय बी चव्हाण सेंटरच्या बाहेर राष्ट्रवादी युवक काँग्रेस राष्ट्रवादी युवती काँग्रेस यांच्या वतीने उपोषण सुरू करण्यात आलेला आहे.
जोपर्यंत शरद पवार राजीनामाचा निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील अशा पद्धतीचा इशारा देत अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या रक्ताच्या सहाय्याने शरद पवार यांना पत्र लिहिले होते. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
पवार साहेब तुमची महाराष्ट्राला गरज आहे आगामी काळातील निवडणुका बघता आमच्यासारख्या तरुणांना तुमच्यासारख्या अनुभवी नेत्याची गरज आहे. त्यामुळे तुम्ही राजीनामा देऊ नका. तुमच्यामुळेच पक्ष आहे अशा पद्धतीच्या विनवण्या करत अनेक पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांना राजीनामा मागे घ्यावा असा हट्ट लावून धरला आहे.
अनेक पदाधिकाऱ्यांनी जोपर्यंत तुम्ही राजीनामाचा निर्णय मागे घेत नाही, तोपर्यंत आम्ही आमचा आंदोलन सुरूच ठेवू अशा पद्धतीचा इशारा देत शरद पवार यांच्याकडे राजीनामा मागे घेण्याची मागणी करत आक्रमक भूमिका घेतली आहे. त्या सर्वांची भूमिका ऐकून घेत शरद पवारांनी आंदोलकांना आश्वासित केले आहे.
राजीनाम्याबाबत मी तुमच्यासोबत चर्चा करायला हवी होती, मात्र मी तुमच्यासोबत जर चर्चा केली असती तर तुम्ही मला राजीनामा देऊ दिला नसता. त्यामुळे माझा हेतू स्वच्छ होता. त्यावरून मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.
तुमच्या भावनांचा मी आदर करतो. येत्या एक ते दोन दिवसांमध्ये याबाबत तुम्हाला इथे बसण्याची वेळ येणार नाही, असं सांगत लवकरच बैठकीनंतर निर्णय होणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितला आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या बैठकीकडे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे.