Shiv Sena MP:शिवसेनेचे 12 ते 14 खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संपर्कात? हे आहेत खासदार..
दोन महिन्यांपूर्वी शिवसेनेचे 12 ते 14 खासदार संपर्कात असल्याचा दावा भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनीही केला होता. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनेचे चार खासदार भेटले, अशीही चर्चा होती. त्यामुळे आता आमदारांपाठोपाठ शिवसेनेचे खासदारही फुटणार का हा प्रश्न आहे.
मुंबई – एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांचे बंड आणि राज्याच्या मुख्यमंत्रीपदी ते विराजमान झाल्यानंतर आता आमदारांपाठोपाठ शिवसेनेचे खासदारही फुटणार अशी चर्चा आहे. शिवसेनेच्या 18 खासदारांपैकी 12 ते 14 खासदार (Shivsena MP)हे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी काल वक्तव्य केले होते. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांची शिवसेना जर महाविकास आघाडीसोबत राहिली तर काही शिवसेना खासदार नाराज होतील, अशीही चर्चा आहे. दक्षिण मध्य मुंबईचे शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी याबाबत उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित भाजपाप्रणित एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा असे आवाहन केले आहे. तर बंडखोरीनंतर झालेल्या सत्तानाट्यात यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी जुळवून घ्यावे, असा सल्ला उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून दिला होता. त्यानंतर काल संजय राऊत यांनी पत्र लिहून शिवसेनेच्या लोकसभा गटनेतेची जबाबदारी भावना गवळी यांच्याऐवजी राजन विचारे यांना दिली आहे. दोन महिन्यांपूर्वी शिवसेनेचे 12 ते 14 खासदार संपर्कात असल्याचा दावा भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनीही केला होता. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनेचे चार खासदार भेटले, अशीही चर्चा होती. त्यामुळे आता आमदारांपाठोपाठ शिवसेनेचे खासदारही फुटणार का हा प्रश्न आहे.
शिवसेना खासदारांची यादी
2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे 18 खासदार राज्यात निवडून आले होते. त्यावेळी एनडीएत असलेल्या शिवसेनेने भाजपासोबत एकत्र निवडणूक लढवली होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या खासदारांची यादी पुढील प्रमाणे..
- प्रतापराव जाधव, बुलढाणा
- कृपाल तुमाने – रामटेक
- भावना गवळी- यवतमाळ-वाशिम
- हेमंत पाटील – हिंगोली
- संजय जाधव – परभणी
- हेमंत गोडसे – शिवसेना
- राजेंद्र गावित – पालघर
- श्रीकांत शिंदे – कल्याण
- राजन विचारे – ठाणे
- गजानन किर्तिकर – मुंबई उत्तर पश्चिम
- राहुल शेवाळे – मुंबई दक्षिण मध्य
- अरविंद सावंत – मुंबई मध्य
- श्रीरंग बारणे – मावळ
- सदाशीव लोखंडे – शिर्डी
- ओमराजे निंबाळकर – उस्मानाबाद
- विनायक राऊत – रत्नागिरी
- संजय मंडलिक – कोल्हापूर
- धैर्यशील माने – हातकणंगले
आमदारांनंतर किती खासदार फुटणार?
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यापासून आपणच शिवसेना आहोत असा दावा करीत आहेत. ११ जुलैला सुप्रीम कोर्टात उद्धव ठारकरे यांच्या शिवसेनेने काढलेल्या व्हीपनुसार वर्तन केले नाही म्हणून १६ आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी होणार आहे. मात्र त्यापूर्वीच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे हेच विधिमंडळ गटनेते असल्याचे आणि त्यांच्याच प्रतोदाला मान्यता दिली आहे. आता शिवसेना कुणाची हा वाद निवडणूक आयोगासमोर जाण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत एकनाथ शिंदे यांना मूळ शिवसेना आणि धनुष्य बाण या निवडणूक चिन्हावर दावा करायचा असेल तर त्यांना शिवसेनेत राज्यात उभी फूट दाखवावी लागणार आहे. त्यात आमदारांसोबतच, खासदार, नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीपर्यंत पक्षात उभी फूट असलेल्याचे दाखवावे लागणार आहे. आमदारांच्या फुटीनंतर आता शिवसेनेचे खासदार फुटणार का, याकडे त्यामुळेच जास्त लक्ष आहे.