उत्साहाला गालबोट… थतड ततडच्या नादात 255 गोविंदा जखमी, एकीचा मृत्यू; कुठे कुठे झाले गोविंदा जखमी?
राज्यात काल सर्वत्र दहीहंडीचा प्रचंड जल्लोष सुरू होता. डिजेच्या तालावर आणि ढोलाच्या गजरात गोविंदा पथकांनी दहीहंड्या फोडल्या. यावेळी वरूणराजानेही हजेरी लावली. त्यामुळे गोविंदांचा उत्साह अधिकच दुणावला. पण या उत्साहावर काही घटनांमुळे विरजण पडलं आहे.
मुंबई | 8 सप्टेंबर 2023 : मुंबई, ठाण्यासह संपूर्ण राज्यात दहीहंडी उत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी डिजेच्या तालावर दहीहंडी फोडण्यात आली. काही ठिकाणी तर सेलिब्रिटींनी दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमात भाग घेऊन गोविंदांचा उत्साह वाढवला. उंचच उंच दहीहंडी गोविंदा पथके फोडत असताना अनेकांचा जीव टांगणीला लागला होता. गोविंदा पथकाचा थरार पाहून तर अनेकांच्या काळजात धस्स होत होतं. गोविंदाच्या सुरक्षेची सर्वच मंडळांनी काळजी घेतली होती. गोविंदांचा विमाही काढण्यात आला होता. मात्र, तरीही उत्साहाला गालबोट लागलं. मुंबईत 255 गोविंदा जखमी झाले. राज्यातही ठिकठिकाणी अनेक गोविंदा जखमी झाले आहेत.
मुंबई शहर आणि उपनगरहात गोविंदा जखमी झाले आहेत. एकूण 255 गोविंदा जखमी झाले आहेत. त्यापैकी 26 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच 229 गोविंदांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यापैकी चार गोविंदांना जबर मार लागसा असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या सर्व गोविंदांना मुंबईतील वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राजावाडी, केईएमसह शताब्दी रुग्णालयात या गोविंदांवर उपचार सुरू आहेत. तसेच काही गोविंदांवर खासगी रुग्णालयातही दाखल करण्यात आलं आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंतची ही माहिती असल्याचं मुंबई महापालिकेने स्पष्ट केलं आहे.
कोणत्या रुग्णालयात किती गोविंदा?
केईएम रुग्णालयात 59 गोविंदांना दाखल करण्यात आलं होतं. त्यापैकी 13 जणांना दाखल करून घेण्यात आलं तर 47 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. नायर रुग्णालयात तीनजणांना दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार करून सोडून देण्यात आलं. हिंदुजामध्येही एकावर उपचार करून सोडून देण्यात आलं.
सायनमध्ये 12 गोविंदा आले होते. त्या सर्वांवर उपचार करून त्यांना सोडून देण्यात आलं आहे. राजावाडीत 16 जण दाखल झाले होते. त्यापैकी 14 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून दोघांवर उपचार सुरू आहेत. गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात आठ गोविंदा आले होते. त्यांच्यावर उपचार करून त्यांना सोडून देण्यात आलं आहे.
वीर सावरकर रुग्णालयात एक गोविंदा आला होता. त्याच्यावर अजूनही उपचार सुरू आहेत. एमटी अग्रवालमध्ये चार तर कुपर रुग्णालयात 10 गोविंदा आले होते. या सर्वांना उपचार करून लगेच सोडून दिलं आहे. कांदिवलीच्या बीडीबी रुग्णालयात 11 पैकी एकावर तर वांद्रे भाभा हॉस्पिटलमध्ये चार पैकी दोघांवर उपचार सुरू आहेत. एचबीटी रुग्णालयात 20 तर व्हीएन देसाई रुग्णालयात 16 रुग्णांवर उपचार करून त्यांना सोडून देण्यात आलं आहे.
शासकीय रुग्णालयातही दाखल
पालिकेसह शासकीय रुग्णालयातही रुग्णांना दाखल करण्यात आलं होतं. जीटी आणि सेंट जॉर्ज रुग्णालयात प्रत्येकी चार पैकी चार रुग्णांवर उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पोद्दार रुग्णालयात 17, जेजे रुग्णालयात चार आणि बॉम्बे हॉस्पिटलमध्ये एकावर उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात 165 गोविंदा दाखल झाले. त्यापैकी 18 जणांवर उपचार सुरू आहेत. तर 47 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शासकीय रुग्णालयात 30 गोविंदा आले होते. त्यापैकी 30 जणांवर उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
स्टँड कोसळला
पुण्यातही दहीहंडीला गालबोट लागलं. पुण्यातील गणेश पेठेत दहीहंडीसाठी उभारलं जाणारं स्टँड कोसळलं. यात तीन जण जखमी झाले आहेत. स्टँड उभारण्याचं काम सुरू असतानाच ते कोसळलं. गोविंद हलवाई चौकात ही घटना घडली.
बुलढाण्यात चिमुरडी दगावली
बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील दहीहंडीतील दुर्देवी घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. हृदयाचा ठोका चुकवणारा हा व्हिडीओ आहे. दहीहंडी फोडताना गोविंदा दहीहंडीला लटकला अन् दहीहंडीसह खाली पडला. मात्र दहीहंडी ज्या दोरीने गॅलरीला बांधली होती, ती गॅलरी ची भिंतही खाली आली. यावेळी एकच धावपळ उडाली. या घटनेत चिमुकली दगावली.