“शिवसेनेतून 40 आमदारांनी उठाव केला ते खोक्यामुळे नाही,”; शिंदे गटाच्या आमदारांनी बंडखोरीचं नेमकं कारण सांगितलं
2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकानंतरही एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री असणार आहेत. तर केंद्रात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान असणार आहेत असा विश्वासही गजानन कीर्तीकर यांनी व्यक्त केला आहे.
मुंबईः राज्यात पदवीधर मतदार संघ, पोटनिवडणूक आणि आगामी काळात महानगरपालिकांच्या निवडणुका होणार असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच शिवसेनेच्या धनुष्यबाणाचा निर्णय ऐकण्याचीही वेळ जवळ आल्याने शिंदे गट आणि ठाकरे गट आता प्रचंड आक्रमक झाले आहेत. सहा महिन्यापूर्वी बंडखोरी करून राज्यात सत्तांतर केलेल्या शिंदे गटाने आपण बंडखोरी का केली ते सांगण्यास सुरुवात केली आहे.
त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार हल्लाबोल करत त्यांनी केलेल्या 50 खोक्यांच्या टीकेलाही प्रत्युत्तर देण्यात आले आहे. यावेळी शिंदे गटाचे नेते गजानन कीर्तीकर यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
शिंदे गटाच्या बंडखोरीबद्दल बोलताना ते म्हणाले की, शिवसेनेतून 40 आमदारांनी उठाव केला ते खोक्यामुळे नाही.
तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाऊन त्यानीं विचार धारा बदलली होती. त्यामुळे या आमदारांनी शिवसेनेला वाचवण्याच काम केलं आहे असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
यावेळी गजानन कीर्तीकर म्हणाले की, ज्यावेळी एकनाथ शिंदे गटाने बंडखोरी केली होती. त्यावेळी सर्वात पहिल्यांदा शीतल म्हात्रे यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता.
तेव्हाच माझ्या मनात जी शिवसेना होती ती कुठे ना कुठे त्रास देत होती त्यामुळे आपणही बंडखोरी केली असल्याचे मत गजानन कीर्तीकर यांनी सांगितले.
गजानन कीर्तीकर यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. ज्या काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर कधीच जुळले नाही तरीही आदित्य ठाकरे हे काँग्रेसच्या राहुल गांधी यांच्यासोबत त्यांनी भारत जोडो यात्रेत सहभागी झाले हे कितपत योग्य आहे असा सवाल त्यांनी आदित्य ठाकरे यांना केला आहे.
आगामी काळात पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका झाल्या नंतर आता महानगरपालिकांच्या निवडणुका लागणार आहेत.
तर आगामी निवडणुकीत शिंदे गट बाजी मारणार असून त्यासाठी कंबर कसली आहे असंही शिंदे गटाकडून सांगण्यात येत आहे.
त्यामुळे 40 महानगरपालिका आहेत आम्ही 20 महानगरपालिका जिंकणार असल्याचा विश्वास कीर्तीकर यांनी व्यक्त केला आहे. मुंबई महापालिकेवर बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचाच महापौर बसणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
तर 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकानंतरही एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री असणार आहेत. तर केंद्रात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान असणार आहेत असा विश्वासही गजानन कीर्तीकर यांनी व्यक्त केला आहे.
गजानन कीर्तीकर यांनी मत व्यक्त करताना सांगितले की, मी 45 वर्षे बाळासाहेबांसोबत काम केले आहे. त्यांनी मला अनेक पदं दिली आहेत.
उद्धव ठाकरे यांच्यावेळी आपल्याला तीनदा उमेदवारी मिळाली कारण त्यांच्याकडे जवळचे लोकांना पद देण्याची हिम्मत नव्हती. माझ्यासारखा ज्येष्ठ नेत्याला त्यांनी बाजूला करून त्यानीं एका नवीन माणसाला केंद्रात मंत्री पद दिलं अशी टीका उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी केली.
माझ्यावर अन्याय झाला तरीही मी शिवसेना सोडली नाही. जेव्हा एकनाथ शिंदे यांनी उठाव केला, तेव्हा मी त्यांच्यासोबत काम करण्याचे ठरवले आणि मी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षा प्रवेश केला असल्याचे मत गजानन कीर्तीकर यांनी व्यक्त केले.