400 जणांच्या धर्मांतर प्रकरणात मुंबईतील एक जण बेपत्ता, कुटुंबियांना येताय धर्मपरिवर्तनाचे फोन
ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून धर्मांतर केलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या माध्यमातून 400 मुलांचे धर्मांतर केल्याचा दावा केला जात आहे. त्यातील एक कुटुंबीय समोर आले आहे. पोलिसांनी त्यांचा जबाबही घेतला आहे.
विजय गायकवाड, मुंबई : दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबादमध्ये ऑनलाइन गेमिंगच्या नावाखाली धर्म परिवर्तनाचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी गाझियाबादमधील मशिदीचा मौलवी अब्दुल रहमान उर्फ नन्नी याला अटक केली आहे. पोलिसांच्या चौकशीत अब्दुल रहमानने अल्पवयीन मुलांवर कट्टरतावाद केल्याची कबुली दिली आहे. या घटनेचे धागेदोरे मुंब्रापर्यंत असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी रहमान याने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील दुसरा आरोपी हा ठाण्यातील मुंब्रा येथील आहे. यामुळे गाजियाबादची एक टीम मुंब्रामध्ये दाखल झाली. स्थानिक मुंब्रा पोलिसांच्या मदतीने शहानवाज नामक आरोपीचा शोध सुरु झाला. हाच शहानवाज गेल्या आठ दिवसांपासून आपल्या घरी येत नसल्याचं आजूबाजूच्या सर्वच शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितलं.
यांनी केला धर्मांतराचा दावा
400 हिंदूंचे मुस्लिम धर्मपरिवर्तन झाले असल्याची सध्या चर्चा सुरू आहे. मात्र या 400 पैकी एकजण वसईतील असल्याचे समोर आले आहे. राजेश जानी असे त्याचे नाव आहे. राजेश जानी 25 मे पासून बेपत्ता असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली. यासंदर्भात त्यांनी वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
कुटुंबियांना फोन
राजेश जानी यांनी इस्लाम कबूल केला आहे. तुम्ही ही इस्लाम कबुल करा, असे त्याच्या कुंटबाला अनोळखी नंबरवरून फोन येत असल्याचे जानी कुटुंबियांनी सांगितले. एक अनोळखी व्यक्ती जानी कुटुंबियांना फोन करून मुस्लिम धर्म किती चांगला आहे, राजेश जानी यांनी इस्लाम कबूल केला आहे, तुम्ही ही विचार करा, असे फोन करत आहे. या फोनची एक अडिओ क्लिप ही समोर आली आहे.
पोलिसांनी घेतले जबाब
वसईच्या माणिकपूर पोलिसांनी राजेश जानी यांची पत्नी, मुलगी, मुलगा यांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांचे जवाब घेतले आहेत. मात्र या सर्व प्रकरणात राजेश जानी सध्या बेपत्ता आहेत.
पोलीस काय म्हणतात
राजेश जानी सध्या बेपत्ता आहे. आम्ही त्यांचा शोध घेणार आहोत. ते मिळाल्यानंतर या सर्व प्रकरणाची खरी सत्यता बाहेर येईल, असे पोलिसांनी सांगितले.
हे ही वाचा
400 मुलांच्या धर्मांतर प्रकरणानंतर जितेंद्र आव्हाड आक्रमक, धर्मांतराचे मुंब्रा कनेक्शन काय?