गोविंद ठाकूर, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 1 ऑक्टोबर 2023 : मुंबईत स्वत:च्या गाडीने येत असाल तर जरा जपून. खिशात पैसे घेऊन या. जरा जास्तीचेच पैसे ठेवा. कारण मुंबईत येणं आता महागलं आहे. मनसेचा (mns) विरोध डावलून टोल दरवाढ (mumbai toll hike) करण्यात आली आहे. 5 रुपयांपासून ते 30 रुपयांपर्यंतची दरवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत एन्ट्री (Mumbai’s five entry points) करणंही महागलं आहे. आजपासून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. मुंबईच्या पाचही एन्ट्री पॉइंटवर अधिकचे पैसे भरल्यानंतरच प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे आता या टोल दरवाढीविरोधात मनसेची काय प्रतिक्रिया उमटते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने ही टोल दरात वाढ केली आहे. टोल दरात वाढ झाल्यानंतर आजपासून मुंबई आणि उपनगरात ये-जा करणाऱ्या वाहनांना टोलसाठी जास्त पैसे द्यावे लागणार आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने टोल दर वाढण्यास विरोध केला आहे. टोल दरवाढ झाल्यामुळे मुंबईचे एन्ट्री पॉइंट असलेल्या वाशी, मुलुंड पूर्व, मुलुंड पश्चिम, ऐरोली आणि दहिसर टोल नाक्यावर अधिकचे पैसे भरूनच मुंबईत प्रवेश करवा लागणार आहे.
या आधी चारचाकी वाहनांना 40 रुपये टोल आकारला जात होता. पण आजपासून हाच टोल 45 रुपये आकारला जाईल. पाचही टोल नाक्यांवर मिनी बससाठी 65 रुपये टोल आकारला जात होता. पण आता हाच टोल 75 रुपये इतका आकारण्यात आला आहे. ट्रकसाठी सध्या 130 रुपये टोल आकारला जात होता. पण आजपासून 150 रुपये टोल आकारला जात आहे. अवजड वाहनांसाठी सध्या 160 रुपये टोल आकारला जात होता. पण आजपासून हेच दर 190 रुपयांवर जावून पोहोचणार आहेत.
चार चाकीच्या टोल दरात 40 रुपयावरून 45 रुपये झाली आहे. म्हणजे 5 रुपयाने वाढ झाली आहे.
मिनि बसच्या टोलमध्ये 65 रुपयांवरून 75 रुपयाने वाढ झाली आहे. म्हणजे 10 रुपयांची वाढ झाली आहे.
ट्रकच्या टोल दरात 130 रुपयांवरून 150 रुपये झाली आहे. म्हणजे 20 रुपयांची वाढ झाली आहे.
अवजड वाहनांच्या टोल दरात 160 रुपयांवरून 190 रुपये वाढ करण्यात आली आहे. म्हणजे 30 रुपयांनी वाढ झाली आहे.
मनसेने कोणत्याही परिस्थितीत ही टोल दरवाढ होऊ देणार नसल्याचं म्हटलं होतं. तसेच या टोल दरवाढी विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही मनसेने दिला होता. मात्र, मनसेचा विरोध डावलून कंपनीने पाचही टोल नाक्यांवर भरमसाठ टोल दरवाढ केली आहे. त्यामुळे सामान्य लोकांच्या खिशाला झळ पोहोचणार आहे. त्यामुळे मनसे आता काय प्रतिक्रिया देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या पाचही टोल नाक्यांवर मनसेचं उग्र आंदोलन होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.