बॉडी बनवण्यासाठी स्टेरॉईड इंजेक्शन, वसईतील तरुणाच्या दोन्ही किडन्या निकामी
समीर साखरेकर असं वसईतील 37 वर्षीय तरुणाचं नाव आहे. बॉडी बनवण्यासाठी समीर जिममध्ये प्रचंड मेहनत घेत होता.
वसई : हल्लीची तरुणाई स्वत:ची शरीरयष्टी बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात धडपडताना दिसत आहे. मसल्स बनवण्यासाठी जिमला जातात. यासाठी आहारामध्येही मोठा बदल करतात. इतकंच नाही तर बॉडी बनवण्यासाठी स्टेरॉईड या इंजेक्शनचाही वापर करतात. मात्र, हेच स्टेरॉईड इंजेक्शन शरीराला खिळखिळ करत असल्याचा धक्कादायक प्रकार वसईमध्ये समोर आला आहे. स्टेरॉईडमुळे वसईतील एका 37 वर्षीय तरुणाच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत. (A 37 year old man from Vasai has failed both his kidneys due to steroids)
समीर साखरेकर असं वसईतील 37 वर्षीय तरुणाचं नाव आहे. बॉडी बनवण्यासाठी समीर जिममध्ये प्रचंड मेहनत घेत होता. मिळालेल्या माहितीनुसार, 2013 पासून तो जिममध्ये जाऊन व्यायाम करायचा. पिळदार शरीर आणि शरीरावरील दिसणाऱ्या नसा म्हणझे बॉडी बनवणं असा त्याचा समज होता. बॉडी बिल्डरप्रमाणे आपल्याही शरीराचा आकार व्हावा यासाठी समीर साखरेकर याने जिम ट्रेनर तसंच मित्रांच्या सांगण्यावरून फेब्रुवारी 2019 पासून स्टेरॉईड असलेली औषधं घेण्यास सुरुवात केली.
यासाठी समीरने इंजेक्शन आणि औषधं घेतली. त्यात टेस्टॉन, बोल्डी, जीएच यांसह काही फॅट बर्नर्स देखील होते. यातील बहुतांश इंजेक्शनमध्ये स्टेरॉईड मोठ्या प्रमाणात होतं. औषधं घेतल्यानंतर समीरला उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ लागला. त्यासाठी काही काळ तो रुग्णालयातही दाखल होता. पण उपचारानंतर बरा होऊन तो घरी परत आला.
काही महिन्यांतच म्हणजे मे पासून त्याला पुन्हा त्रास सुरू झाला. त्याच्या शरीराला सूज येणं सुरू झालं. सूज इतकी वाढली होती की त्याला चालताही येत नव्हतं. अखेर अनेक तपासण्यांनंतर दोन्ही किडन्या निकामी झाल्या असल्याचं समोर आलं. (A 37 year old man from Vasai has failed both his kidneys due to steroids)
9 जुलैपासून त्याचं डायलिसिस सुरू झालं. आठवड्यातून तीन वेळा डायलिसिस करावं लागत. समीर साखरेकर त्याच्या घरातील एकमेव कमावता होता. त्याच्या मध्यमवर्गीय कुटुंबात आज त्याचे आई, वडील, पत्नी, दोन लहान मुल असं कुटुंब आहे. घरची परिस्थिती अगदी बेताचीच आहे.
अशा स्थितीत या गंभीर आजारपणाशी तोंड कसे देणार हा प्रश्न त्याच्या कुटुंबासमोर आहे. समीरचं वय 37 वर्ष आहे. या वयात दोन्ही किडन्या निकाम्या झाल्यामुळे डॉक्टरांनी त्याला किडनी प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला आहे. नाहीतर आयुष्यभर त्याला डायलिसिस करावं लागेल.
किडनी प्रत्यारोपणासाठी तब्बल 10 ते 12 लाखांचा खर्च येणार आहे. संपूर्ण कुटुंब समीर साखरेकरांवर अवलंबून असल्यामुळे ते पैशांची जुळवाजुळव करत आहे. मात्र सरकारने, स्वयंसेवी संस्थांनी, दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन जमेल तशी मदत करण्याचे आवाहन साखरेकर कुटुंबीय करत आहेत.
इतर बातम्या-
Special Report | ‘स्टेरॉईड’ रोखणार कोरोना रुग्णांचे मृत्यू?
VIDEO: बॉडी बिल्डिंगसाठी स्टेरॉईडचं अतिसेवन, ठाण्यात तरुणाचा मृत्यू
(A 37 year old man from Vasai has failed both his kidneys due to steroids)