मुंबई : नववर्षाते स्वागत करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांना एक गूड न्यूज दिली, मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे यांनी बैठक घेत मुंबईकरांसाठी एक मोठा निर्णय जाहीर केला, त्यामुळे लाखो मुंबईकरांना नवीन वर्षाचं एक मोठं गिफ्ट मिळाले. मुंबई महानगरपालिका हद्दीतील पाचशे चौरस फूट किंवा त्यापेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्यास आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली. मंत्रिमंडळ बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 1 जानेवारी, 2022 रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये मुंबई महापालिकेच्या मागणीनुसार 46.45 चौ. मी. (500 चौ. फूट) अथवा त्यापेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या निवासी मालमत्तांना संपूर्ण मालमत्ता कर माफ करण्याचे जाहीर केले होते.
निर्णयाचा फायदा लाखो मुंबईकरांना
मंत्रिमंडळाच्या मंजुरीनुसार आता या निर्णयाची 1 जानेवारी, 2022 पासून अंमलबजावणी होणार आहे. या निर्णयामुळे मुंबई महापालिका क्षेत्रातील 16.14 लाख निवासी मालमतांना या संपूर्ण कर सवलतीचा लाभ मिळणार आहे. या सवलतीमुळे महापालिकेच्या कर महसुलात सुमारे 471 कोटी आणि राज्य शासनाच्या महसुलात सुमारे 45 कोटी असा एकूण 462 कोटींचा महसूल कमी होणार आहे.
आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईकांना घर घेणेही आणखी सोपे झाले आहे. तसेच इतरही काही मोठे निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आले आहेत. कामगार संख्या 10 पेक्षा कमी असलेल्या आस्थापना तसेच 10 पेक्षा अधिक असलेल्या आस्थापना, अशा सर्व आस्थापना, देवनागरी लिपीत मराठी भाषेमध्ये नामफलक प्रदर्शित करतील. असे आदेश आज काढण्यात आलेत, त्याचबरोबर कोविडमुळे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांना करमाफी देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. शाळांच्या मालकीच्या तसेच केवळ स्कूल बस म्हणून वापरात येणाऱ्या बसेस, शाळांनी कंत्राटी पद्धतीने घेतलेल्या तसेच केवळ शाळेतील मुलांना ने-आण करण्यासाठी शाळेव्यतिरिक्त इतरांच्या स्कूल बसेसना 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीसाठी वार्षिक करातून 100 टक्के कर माफ करण्यात येईल. असेही जाहीर करण्यात आले आहे.