Mumbai Crime : लग्नासाठी लाखो रुपये घेऊन फरार झालेल्या आशिकला मिर्झापूरमधून अटक
स्वतःच्या लग्नासाठी कांदिवली(Kandivali)तील प्रसिद्ध जैन स्वीट्समधून लाखो रुपये घेऊन पळून गेलेल्या उत्तर प्रदेशातील मिर्झापूर (Mirzapur) येथील प्रियकराला मुंबई(Mumbai)च्या कांदिवली पोलिसांनी अटक केली आहे.
मुंबई : स्वतःच्या लग्नासाठी कांदिवली(Kandivali)तील प्रसिद्ध जैन स्वीट्समधून लाखो रुपये घेऊन पळून गेलेल्या उत्तर प्रदेशातील मिर्झापूर (Mirzapur) येथील प्रियकराला मुंबई(Mumbai)च्या कांदिवली पोलिसांनी अटक केली आहे. संबंधित व्यक्तीला मालकाने बँकेत पैसे ठेवण्यास सांगितले होते. मात्र मालकाने दिलेले पैसे बँकेत न भरता स्वत:च्या गावी घेऊन तो पळून गेला होता. त्याला अखेर पोलिसांनी अटक (Arrest) केली आणि मुंबईत आणले.
सर्वात विश्वासू सहकारी
पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत पवार यांनी सांगितले, की कांदिवली पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या जैन स्वीट्सचे मालक प्रदीप जैन यांनी २७ डिसेंबरच्या रात्री त्यांच्या विश्वासू व्यक्तीला बँकेत जमा करण्यासाठी ३ लाख ४० हजार रुपये दिले. दुसऱ्या दिवशी आरोपी बँकेपर्यंत तो पैसे घेऊन गेला पण बँकेत पैसे जमा केले नाहीत आणि दुसऱ्या दिवशीही कामावर आला नाही. त्याचा मोबाइलही बंद होता. तेव्हा सेठला समजलं, की आपला माणूस पैसे घेऊन पळून गेला आहे.
कांदिवली पोलिसांकडून तपास
घटनेनंतर कांदिवली पोलिसांनी तक्रार नोंदवून तपास सुरू केला असता, सीसीटीव्हीमध्ये आरोपी बँकेच्या बाहेर दिसला आणि बँकेच्या बाहेरच दुचाकी टाकून तिकडे जाताना दिसला. पोलिसांनी त्याच्या इतर साथीदारांची चौकशी केली असता त्यांनी सांगितले, की आरोपीचे लग्न ठरले असून तो गावी जाणार होता. त्यानंतर पोलिसांचे एक पथक उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे गेले आणि आरोपीला त्याच्या घरातून अटक करून मुंबईत आणले.
गावाकडे बांधणार होता घर
चौकशीत आरोपीने पोलिसांना सांगितले, की त्याचे लग्न होणार होते, त्यासाठी तो घर बांधणार होता, त्याला आणखी पैशांची गरज होती, त्यामुळे तो त्याच्या मालकाचे पैसे घेऊन पळून गेला. रोहित मनोज मिश्रा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो 21 वर्षांचा आहे. तो गेल्या 5 वर्षांपासून जैन स्वीट्समध्ये काम करत होता आणि तो त्याच्या बॉसचा सर्वात विश्वासू माणूस होता.
दोन लाख वीस हजार जप्त
सध्या कांदिवली पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून दोन लाख 20 हजार रुपये जप्त केले आहेत. आता पोलीस अधिक तपास करत आहेत.