मुंबईतील शहरी बेघरांसंदर्भात धोरण बनविण्यासाठी होणार सर्व्हेक्षण
बेघर निवारा केंद्रांमध्ये वास्तव्यास असलेल्या नागरिकांसाठी विविध शिबीर आयोजित करण्यात येत आहेत. त्यातून संबंधित नागरिकांचे पॅनकार्ड, आधारकार्ड इत्यादी आवश्यक ती शासकीय ओळखपत्र बनविण्याची योग्य प्रक्रिया करण्यात येत आहे.
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने शहरी बेघरांसाठी धोरण बनविण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली असून त्यासाठी लवकरच सर्वेक्षणाचा प्रारंभ होणार आहे. बेघर व्यक्तींना निवारा केंद्रांमध्ये तात्पुरता निवारा देणे, त्यांना स्वावलंबी व सक्षम बनवून पुन्हा समाजामध्ये सन्मानजनक स्थान मिळवून देण्यासाठी करावयाचे प्रयत्न या बेघरांबाबतच्या धोरणामध्ये समाविष्ट असतील. त्यादृष्टीने शहरी बेघर व्यक्तिंच्या मदतीसाठी 1800227501 हा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक देखील सोमवार, 11 ऑक्टोबर 2021 पासून सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेमध्ये कार्यरत होणार आहे, अशी माहिती सहायक आयुक्त (नियोजन) किरण दिघावकर यांनी दिली आहे. (A survey will be conducted to formulate a policy regarding urban homeless in Mumbai)
संपूर्ण जगभरात सन 2010 पासून दिनांक 10 ऑक्टोबर हा दिवस जागतिक बेघर दिन म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडूनही विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. महानगरपालिका प्रशासनाकडून आजपर्यंत विविध ठिकाणी बेघर निवारा केंद्र सुरु करण्यात आली आहेत. त्यापुढे जावून आता धोरण निश्चिती करुन उपक्रम राबविले जाणार आहेत. बेघरांना निवारा केंद्रांमध्ये तात्पुरता आश्रय दिल्यानंतर, त्यांना स्वावलंबी होता यावे, स्वरोजगार व स्व निवारा मिळवता यावा, यादृष्टीने कामकाज करण्यासाठी हे धोरण महत्त्वाचे असेल. त्यादृष्टीने पहिले पाऊल म्हणून सर्वप्रथम शहरी बेघरांचे सर्व्हेक्षण हाती घेण्यात येत आहे.
शहरी बेघर निवारा केंद्रात महानगरपालिका प्रशासनाकडून हाती घेतलेल्या नवीन उपाययोजना
– शहरी बेघरांसाठी धोरण बनविण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली असून त्यासाठी सर्वेक्षण लवकरच सुरु होणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात रेल्वे स्थानक, बस स्थानक, बाजारपेठा, प्रार्थनास्थळं इत्यादी ठिकाणी हे सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे.
– शहरी बेघर व्यक्तिंच्या मदतीसाठी 1800227501 हा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक देखील सोमवार, 11 ऑक्टोबर 2021 पासून सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेमध्ये कार्यरत होणार आहे. या क्रमांकावर संपर्क साधून सर्वसामान्य नागरिक, बेघरांच्या कल्याणासाठी कार्यरत संस्था या माहिती देवू शकतील.
– बेघर निवारा केंद्रांची पुरेशी संख्या वाढविण्यासाठी प्रशासनाचे सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. लवकरच आणखी 4 निवारा केंद्र कार्यान्वित होणार आहेत. चांदिवली, दहिसर, अंधेरी, गोवंडी या ठिकाणी ही केंद्र असतील.
– माहूल येथील म्हाडा वसाहत डी सेक्टर इमारतीमध्ये 224 खोल्या बेघर निवाऱ्याकरीता उपलब्ध करुन या ठिकाणी जवळपास 1500 व्यक्तींची व्यवस्था करणे शक्य होणार आहे. याच ठिकाणी कौशल्य प्रशिक्षण केंद्रही सुरु केले जाणार आहे. परिणामी, बेघर व्यक्तिंना निवाऱयामध्ये आश्रयास आल्यानंतर, स्वरोजगारक्षम व स्वावलंबी होवून समाजात पुन्हा स्थान मिळेल.
– बेघर निवारा केंद्रांमध्ये वास्तव्यास असलेल्या नागरिकांसाठी विविध शिबीर आयोजित करण्यात येत आहेत. त्यातून संबंधित नागरिकांचे पॅनकार्ड, आधारकार्ड इत्यादी आवश्यक ती शासकीय ओळखपत्र बनविण्याची योग्य प्रक्रिया करण्यात येत आहे.
– बेघर निवारा केंद्रांमध्ये विविध शासकीय यंत्रणांच्या भेटी घडवून आणण्यात येत आहेत. जसे की, महानगरपालिकेचे संबंधित विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, महिला व बालकल्याण विभाग, महिला बचत गट, वस्ती इतर संघ, शहर संघ यांना निमंत्रित करुन बेघरांना विविध योजनांचा लाभ मिळेल, त्यांना रोजगार प्राप्ती होवून स्वावलंबी होता येईल, स्वनिवारा मिळवता येईल, याबाबत जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत.
– केंद्रांमध्ये वास्तव्यास असलेल्या, पात्र नागरिकांचे कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण देखील करण्यात येत आहे.
– जागतिक बेघर दिनाच्या पार्श्वभूमीवर, बेघर निवारा केंद्रांमध्ये राहणाऱया नागरिकांचे मनोधैर्य वाढीसाठी आरोग्य तपासणी व सांस्कृतिक उपक्रमदेखील होणार आहेत. तसेच त्यांना मास्क व सॅनिटायझर वितरित केले जाणार आहेत.
– बेघरांसाठी असलेल्या वेगवेगळ्या कल्याणकारी योजना तसेच बेघर निवाऱयाबाबत जनजागृती करण्यासाठी मुंबईतील रेल्वे स्थानकांबाहेर व सार्वजनिक ठिकाणी फलक लावणे, दृकश्राव्य माध्यमांचा आणि समाजमाध्यमांचा उपयोग करुन जनजागृती करणे, हे उपक्रम हाती घेण्यात येत आहेत.
शहरी बेघर निवारा केंद्रांसाठी महानगरपालिका प्रशासनाकडून आतापर्यंत केलेल्या उपाययोजना
– मुंबई महानगरात सद्यस्थितीत शहरी बेघर असलेल्या प्रौढांसाठी एकूण 12 निवारा केंद्र सुरु आहेत. या सर्व केंद्रांची मिळून एकूण क्षमता 342 व्यक्ती सामावतील इतकी आहे. या केंद्रांमध्ये सद्यस्थितीत 239 नागरिक वास्तव्यास आहेत.
– मुंबई महानगरात सद्यस्थितीत शहरी बेघर असलेल्या 18 वर्ष वयाखालील मुलांसाठी एकूण 11 निवारा केंद्र सुरु आहेत. या सर्व केंद्रांची मिळून एकूण क्षमता 590 मुले सामावतील इतकी आहे. या केंद्रांमध्ये सद्यस्थितीत 488 मुले वास्तव्यास आहेत.
– दरवर्षी, पावसाळ्याच्या कालावधीपुरते म्हणजे 1 जून ते 31 ऑक्टोबर हा कालावधी ग्राह्य धरुन अतिरिक्त बेघर निवारा केंद्र सुरु करण्यात येतात. सध्या मुंबईत ठिकठिकाणी मिळून असे 12 केंद्र सुरु आहेत. त्यांची क्षमता 930 व्यक्ती इतकी असून त्यात 269 नागरिक राहत आहेत.
– या विविध निवारा केंद्रांचे कामकाज चालवून त्यांचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी निरनिराळ्या संस्थांची मदत होत असते. या संस्थांना दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत निधी देण्यात येतो. या संस्थांसमवेत महानगरपालिकेचे त्या-त्या विभागातील समाज विकास अधिकारी (नियोजन) हे समन्वय साधून देखरेख करतात. (A survey will be conducted to formulate a policy regarding urban homeless in Mumbai)
Garuda Purana : या 5 गोष्टी तुम्हाला दु:खापासून ठेवतात दूर, या करण्याची सवय लावाhttps://t.co/GlnrpL88HE#GarudaPurana |#Sorrow |#Habit |#Religion
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 9, 2021
इतर बातम्या