बाईक खड्ड्यात अडकली आणि पाठून ट्रकने धडक दिल्याने तरूणाचा मृत्यू , भिवंडीतील घटनेने हळहळ
कुंभारकर एका प्रायव्हेट कंपनीचे कर्मचारी आहेत. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. तर अपघातात जखमी झालेले सुजय शिवाजी नाईक वाहतूक पोलीस आहेत.
मुंबई : रस्त्यांवरील खड्डयाने दुचाकीचे अपघात होऊन त्यात अनेकांचे बळी गेले आहेत. आता भिंवडी रोडवर एका दुचाकीस्वाराचे रस्त्यातील खड्ड्यांमुळे नियंत्रण ढासळले आणि तेवढ्यात पाठून येणाऱ्या भरधाव ट्रक अंगावरून गेल्याने या 33 वर्षीय दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू ओढवल्याची घटना घडली आहे. या घटनेत या तरूणाच्या दुचाकीवर पाठी मागे बसलेले वाहतूक पोलिस जखमी झाले आहेत. बुधवारी रात्री साडे दहाच्या सुमारास हा अपघात घडला आहे.
भिंवडीच्या भडवाड गावातील रहीवासी भाऊसाहेब उर्फ विशाल मारूती कुंभारकर ( वय 33 ) हे आणि सुजय शिवाजी नाईक ( वय 42 ) हे दोघे जण दुचाकीवरून भिंवडी येथून कल्याण जात होते. त्यावेळी बुधवारी रात्री साडे दहाच्या सुमारास त्यांची बाईक एका खड्ड्यामुळे रस्त्यात पडली त्यावेळी पाठून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकच्या खाली कुंभारकर आले, त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. लोकांनी स्थानिक पोलिसांना कळविल्याने कुंभारकर यांना तातडीने इंदिरा गांधी मेमोरियल दवाखान्यात नेण्यात आले. तेथे दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. तर दुचाकीवर पाठीमागे बसलेले नाईक दुसऱ्या बाजूला पडल्याने जखमी झाल्याने त्यांच्या रूग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
घटनास्थळावरून ड्रायव्हर फरार
कुंभारकर एका प्रायव्हेट कंपनीचे कर्मचारी आहेत. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. तर अपघातात जखमी झालेले सुजय शिवाजी नाईक ( वय 42 ) हे भिंवडीच्या नारपोली पोलीस ठाण्यात वाहतूक शाखेत कार्यरत असल्याची माहिती उघडकीस आली आहे. हे दोघे जण एकमेकांचे मित्र आहेत की नातलग याचा उलगडा होऊ शकलेला नाही. दरम्यान या प्रकरणात माल वाहतूक ट्रकचा चालकाविरोधात भादंवि 279 ( रॅश ड्रायव्हींग ), 338 ( गंभीर दुखापती जबाबदार ) आणि304 अ ( सदोष मनुष्यवध ) कलमांनूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी जमाव जमल्याने ड्रायव्हर घटनास्थळावरून फरार झाला आहे. आम्ही फरार ट्रक ड्रायव्हरचा जबाब नोंदविण्यासाठी त्याच्या विरोधात नोटीस काढली आहे. लवकरच आम्ही त्याला अटक करू अशी माहीती शांती नगर पोलिस ठाण्याचे सहायक उप निरीक्षक काशीनाथ पोटे यांनी हिंदुस्थान टाईम्सला सांगितले.