त्याने उंचावरुन स्विमिंग पूलमध्ये उडी घेतली, पण इथेच घात झाला, तरुण वृद्धाच्या अंगावर पडला अन्…
एक 72 वर्षीय वृद्ध आणि 20 वर्षाचा तरुण दोघेही स्विमिंग पूलमध्ये अंघोळीला गेले होते. वृद्ध व्यक्ती स्विमिंग पूलमध्ये पोहत होते, तर तरुण जल्लोषात उंचावरुन स्विमिंग पूलमध्ये उडी घ्यायला. पण ही उडीच वृद्धला महागात पडली.
मुंबई : मुंबईतील गोरेगाव परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्विमिंग पूलमध्ये अंघोळीला गेलेल्या वृद्धासोबत जे घडले ते भयानक होते. स्विमिंग पूलमध्ये अंघोळीसाठी आलेल्या एका तरुणाने उंचावरुन स्विमिंग पूलमध्ये उडी घेतली आणि मग अनर्थच घडला. तरुणाला ही उडी अत्यंत महागात पडली आहे. तरुणाने उडी घेतली असता तो थेट स्विमिंग पूलमध्ये असलेल्या 72 वर्षाच्या वृद्धाच्या अंगावर पडला. या घटनेत वृद्ध गंभीर जखमी झाला आणि यातच त्याचा मृत्यू झाला. विष्णु सामंत असे मयत वृद्धाचे नाव आहे. मृताच्या कुटुंबीयांनी तरुणावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे.
गोरेगावमधील ओझोन स्विमिंग पूलमध्ये घडली घटना
मुंबईतील गोरेगावच्या पश्चिम भागातील ओझोन स्विमिंग पूलमध्ये रविवारी संध्याकाळी ही घटना घडली. 72 वर्षीय विष्णू सामंत हे ओझोन स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करण्यासाठी गेले होते. यावेळी एक 20 वर्षीय तरुणही तेथे अंघोळीसाठी आला होता. तरुणाने अचानक उंचावरून स्विमिंग पूलमध्ये उडी मारली आणि तो थेट विष्णू सामंत यांच्यावर पडला. या अपघातात सामंत गंभीर जखमी झाला. त्याच्या मानेवर आणि शरीराच्या अनेक भागांवर जखमा होत्या.
तरुणावर निष्काळजीपणाचा आरोप
विष्णू सामंत यांना जखमी अवस्थेत जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर विष्णू यांच्या पत्नीने तरुणावर निष्काळजीपणे उडी मारल्याचा आरोप केला आहे. विष्णूच्या मृत्यूला तरुणच जबाबदार असल्याचे त्यांच्या पत्नीचे म्हणणे आहे.