मुंबईत कुठलं मंदिर झाकलं जाणार? हे हिंदुत्व का? आदित्य ठाकरेंचा सवाल
"मुंबादेवीच्या मंदिरात दोनदा जाऊन आलो. तिथे भाजपच्या आमदाराला कॉरिडोर करायचा आहे. त्यांना दागिना बाजार हटवायचा आहे. मंदिराच्या मागे सतरा मजली इमारत पार्किंगसाठी उभी करायची आहे. मंदिर झाकलं जाणार आहे. हे हिंदुत्व आहे?", असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.
“भाजपला हिंदुत्वाचं सर्टिफिकेट देण्याचा अधिकार कोणी दिला? आम्हाला भाजपच्या सर्टिफिकेटची गरज नाही. भाजपही सर्टिफिकेट देणारी संस्था नाही. माझ्या आजोबांनी भूमिपुत्राच्या मुद्यावरून पक्ष उभा केला. तेच भाजप मानत नाही. आमचं हिंदु्त्व चूल पेटवणारं आहे. भाजपचं हिंदुत्व घर पेटवणारं आहे. ते आधी हिंदुत्वावर बोलतात. नंतर काहीच नसलं तर भारत पाकिस्तानवर येतात. सर्वाधिक अतिरेकी हल्ले हे भाजपच्या सत्तेतच झाले आहेत” असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला. ते TV9 मराठीच्या ‘महाराष्ट्राचा महासंकल्प’ कार्यक्रमात बोलत होते.
“मुंबादेवीच्या मंदिरात दोनदा जाऊन आलो. तिथे भाजपच्या आमदाराला कॉरिडोर करायचा आहे. त्यांना दागिना बाजार हटवायचा आहे. मंदिराच्या मागे सतरा मजली इमारत पार्किंगसाठी उभी करायची आहे. मंदिर झाकलं जाणार आहे. हे हिंदुत्व आहे? अयोध्येच्या बाजूला लोढा आणि इतरांनी जमीन घेतली आहे. या जमिनीवर घरे बांधून कारसेवकांना देणार आहात का? यांचं हिंदुत्व हे कमर्शिअल आहे. वाजपेयी आणि अडवाणींचं हिंदुत्व राहिलं नाही. चंद्राबाबू आणि नितीश कुमार हे काय हिंदुत्व आहे काय?” असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला.
‘अटकेची भीती कशासाठी होती?’
“ही भाजप मुंडे-महाजनांची नाहीये. महायुती तुटल्याला भाजप जबाबदार आहे. विनोद तावडे, राज पुरोहित आणि पंकजा मुंडे या मूळ भाजपच्या लोकांना यांनी बाजूला केलं होतं” असं आदित्य ठाकरे म्हणाले. गिरीश महाजन यांच्या अटकेच्या प्रयत्नावर आदित्य ठाकरे म्हणाले की, “अटकेची भीती कशासाठी होती? काही चुकीचं केलं असेल ना. एवढं घाबरण्याचं कारण काय होतं?” “आमचं तर भाजपच्या सरकार सारखं नव्हतं, कुणालाही अटक करा. मिंधेंना अटक करण्याची भाजपची तयारी होती. हे मिंधे यांनी आमच्याकडे येऊन रडत रडत सांगितलं होतं” असं आदित्य ठाकरे म्हणाले.