‘त्यांना थंडी एन्जॉय करूद्या; आमच्याकडे फोटो आलेत’, आदित्य ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या दावोसच्या दौऱ्यावर गेले आहेत. पण त्यांच्या दावोसच्या दौऱ्यावरुन युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मोठा इशारा दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्याचे आपल्याकडे फोटो आल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
मुंबई | 18 जानेवारी 2024 : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या जागतिक आर्थिक परिषदेच्या निमित्ताने दावोसच्या दौऱ्यावर गेले आहेत. याच दौऱ्याचे फोटो आपल्याकडे आल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे “मुख्यमंत्र्यांना सध्या दावोसमध्ये थंडी एन्जॉय करुद्या. ते महाराष्ट्रात आल्यावर आम्ही वातावरण गरम करु. आमच्याकडे सर्व फोटो आले आहेत”, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावरुन आगामी काळात काय-काय आरोप-प्रत्यारोप होतात ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
ठाकरे गटाचे आमदार राजीन साळवी यांच्या घरी आज एसीबीच्या पथकाने धाड टाकली. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी तब्बल आठ तास राजन साळवी यांच्या घराची झाडाझडती घेतली. त्यानंतर एसीबीचं पथक राजन साळवी यांना घेऊन रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेत घेऊन गेलं. राजन साळवी यांच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेल्या कागदपत्रांची छाननी एसीबी अधिकाऱ्यांनी केली. राजन साळवी यांच्याविरोधात एसीबीने गुन्हा देखील दाखल केला आहे. त्यांच्यावर अटकेच्या कारवाईची टांगती तलवार आहे. असं असलं तरी राजन साळवी यांनी अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव घेतलेली नाही.
आपण अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात जाणार नाही. एकवेळ पोलीस कस्टडीत जायला आपण तयार आहोत. आपण काहीच चुकीचं वागलेलं नाही. त्यामुळे एसीबीच्या कारवाईला सामोरं जात आहोत. त्यांनी अटक केली तर सामोरं जायला तयार आहोत, अशी भूमिका साळवी यांनी घेतली आहे. साळवी यांच्यावरील कारवाईवर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या दावोसच्या दौऱ्याचे फोटो बाहेर काढण्याचा इशारा दिला आहे.
आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले?
“सत्यासाठी काम करणाऱ्यांना अटक केली जाते. देश यांना बरोबर उत्तर देणार आहे. घाबरणारे हुकुमशाह आपल्याविरोधात बोलणाऱ्याला अटक करत होते. हिटलरसारखच भाजप पक्ष घाबरलेला आहे. जेवढी हुकुमशाही राजवट पोकळ असते, तेवढं यंत्रणाचा वापर करतात. देश या हुकुमशाही करणाऱ्यांना दाखवणार आहे. लोकशाहीसाठी लढणाऱ्यांना हैराण केलं जातं आहे”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
“दावोसमध्ये दोन पत्रकारांना आणि काही जणांना आणि दलालांना दावोसला नेलेलं आहे. आम्हाला सर्व माहिती मिळालेली आहे. आमच्याकडे फोटोस आलेले आहेत. आता सध्या त्यांना थंडी एन्जॉय करूद्या. ते आल्यावर आम्ही वातावरण गरम करणार आहोत. सगळे फोटो वैगरे आमच्याकडे आलेले आहेत. दावोसचे करार आम्हाला माहिती आहे”, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे.