लोकसभेचं बिगुल वाजलं? आदित्य ठाकरे यांची मुंबईत पहिली सभा; कुणासाठी बॅटिंग?
लोकसभा निवडणुकीच्या तारखा अजून जाहीर व्हायच्या आहेत. मात्र, या निवडणुका मार्चमध्ये होणार असल्याचं राजकीय नेते गृहित धरून आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची मुंबईत पहिलीच सभा होणार आहे. या सभेतून आदित्य ठाकरे लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार आहेत.
निवृत्ती बाबर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 1 जानेवारी 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती आणि आघाडीमध्ये जागा वाटपाची चर्चाच सुरू आहे. कोणत्याही पक्षाने जागा वाटप झाल्याचं जाहीर केलेलं नाही. निवडणुकांना अजून दोन महिन्याचा अवकाश असल्याने अजूनही जागा वाटपाचं घोंगडं वाटाघाटीत अडलं आहे. मात्र, असं असलं तरी अनेक नेत्यांनी राज्याचे दौरे सुरू केले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण निर्मिती करण्यावर सर्वच नेत्यांचा भर आहे. याच पार्श्वभूमीवर माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनीही लोकसभेच्या मैदानात उडी मारली आहे. आदित्य ठाकरे यांची लोकसभा निवडणुकीसाठीची मुंबईतील पहिलीच सभा दक्षिण मुंबईत होत आहे.
माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार अरविंद सावंत यांच्यासाठी मैदानात उतरले आहेत. आदित्य ठाकरे यांची येत्या 6 जानेवारी रोजी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात सभा होणार आहे. गिरगाव येथे विभाग क्रमांक 12 ने आदित्य ठाकरे यांच्या सभेच आयोजन केलं आहे. या सभेतून आदित्य ठाकरे हे खासदार अरविंद सावंत यांचा प्रचार करणार आहेत. त्यामुळे मुंबईतील वातावरण ढवळून निघणार आहे.
उमेदवारी निश्चित
दक्षिण मुंबईत ठाकरे गटाकडून अरविंद सावंत यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. महाविकास आघाडीनेही विद्यमान खासदारांना पुन्हा संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच आदित्य ठाकरे हे अरविंद सावंत यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. तर अरविंद सावंत यांना भाजपकडून आव्हान मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे शिंदे गटाने महायुतीकडे 23 जागांची मागणी केली आहे. त्यात दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. त्यामुळे भाजप ही जागा शिवसेना म्हणून शिंदे गटाला सोडणार की त्या जागेवर आपला दावा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दक्षिण मुंबई सर करायचीच
ठाकरे गटाकडून दक्षिण मुंबईत लोकसभेची प्रचंड तयारी केली जात आहे. कोणत्याही परिस्थितीत दक्षिण मुंबईचा किल्ला राखायचाच, असा निर्धारच ठाकरे गटाने केला आहे. त्यामुळे या मतदारसंघात ठाकरे गटाकडून आगोदरपासूनच शाखानिहाय बैठका, लोकसभेचा आढावा, विधानसभानिहाय बैठका तसेच इतर कार्यक्रम घेण्यात आले होते. त्यानंतर आता ही सभा होत आहे. त्यामुळे या सभेला मतदार कसा प्रतिसाद देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.